निसर्गाच्या सान्निध्यातील तीर्थक्षेत्र बाहुबली

राजू मुजावर
शनिवार, 12 जानेवारी 2019

कुंभोज - संपूर्ण भारतामध्ये जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असणारे बाहुबली तीर्थक्षेत्र हे अन्य धर्मीयांनाही आकर्षित करते. दक्षिण भारतातील मिनी शत्रुजंय म्हणून हे देश-विदेशांत प्रसिद्ध आहे. भारतामध्ये राजस्थाननंतर कुंभोजगिरी येथील जहाजमंदिर बाहुबली पहाडावरील श्री १००८ भगवान बाहुबलींची अतिप्राचीन मूर्ती यांसह आधुनिक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. 

कुंभोज - संपूर्ण भारतामध्ये जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असणारे बाहुबली तीर्थक्षेत्र हे अन्य धर्मीयांनाही आकर्षित करते. दक्षिण भारतातील मिनी शत्रुजंय म्हणून हे देश-विदेशांत प्रसिद्ध आहे. भारतामध्ये राजस्थाननंतर कुंभोजगिरी येथील जहाजमंदिर बाहुबली पहाडावरील श्री १००८ भगवान बाहुबलींची अतिप्राचीन मूर्ती यांसह आधुनिक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. 

हातकणंगले तालुक्‍यामध्ये कुंभोजगिरी-बाहुबली हे तीर्थक्षेत्र प्राचीनस्थळ आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सौंदर्याने नटलेले हे स्थळ सुमारे १५० वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. येथील धर्मशाळेसमोर कलात्मक, रचनात्मक व शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले जहाजमंदिर आहे. १५४ फूट लांब, १२२ फूट रूंद व २५ फूट उंच असे तीन मजली जहाजमंदिर आहे. मंदिराभोवताली नयनरम्य परिसर आहे.

जहाजमंदिराच्या पहिल्या मजल्यावर १०८ इंच उंच श्री आदेश्वर भगवानांची जटायुक्त प्रतिमा, गाभाऱ्यातील आकर्षक व नक्षीदार खांब याचे दर्शन होते. तसेच भगवान निलमणी पार्श्वनाथ महाराजांची १०८ फूट उंचीची अखंड संगमरवरी मूर्ती व भगवान आदिनाथांची परिवारासोबत असलेली प्रतिमा मनाचा वेध घेते.

डेकवरील ६१ इंच उंच निलवर्णी, मर्गज रत्नांनी मढवलेली मूलनायक इच्छापूर्ती निलमणी, पार्श्वनाथ मूर्ती यांसह जहाजमंदिर परिसरात २४ आकर्षक मंदिरे, ९ ग्रहांसह सिद्धचक्राची झाडे, ४१ इंचाची श्रीमंधर स्वामी देवकुलिका गुहेत विराजमान झालेली भोमियाजी महाराज व सर्वांत वेगळे असे ज्वालामालिनी मंदिर आहे. येथे जैनधर्माचा संपूर्ण इतिहास दर्शवणारे म्युझियम आहे.

जहाजमंदिरासमोरील बाहुबली पहाडावर श्री १००८ भगवान बाहुबलींची ११५३ साली प्रतिष्ठापित केलेली मूर्ती आजही या क्षेत्राची प्राचीनता दर्शवत आहे. प. पू. गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या पदस्पर्शाने हे तीर्थधाम व समाज उद्धाराचे केंद्र बनले आहे. परमपूज्य चारित्रचक्रवर्ती आचार्य×श्री १०८ शांतिसागर महाराज यांच्या प्रेरणेने समंतभद्र महाराजांनी १९६३ मध्ये २८ फूट उंचीचे भगवान श्री १००८ बाहुबलींची मूर्ती प्रतिष्ठापित केली. पाढऱ्या शुभ्र संगमरवरात कोरलेली मूर्ती या ठिकाणच्या वैभवात भर घालते. येथे दिंगबर जैन सिद्धक्षेत्राची प्रतिकृती, श्री महावीर समोशरण मंदिर, नंदीश्वर पंचमेरूची रचना, स्वयंभू मंदिर, रत्नत्रय जिनमंदिर, कीर्तीस्तंभ आदीमुळे परिसर प्रसिद्ध आहे. 

बाहुबलीपासून हाकेच्या अंतरावर कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई पाटील शैक्षणिक संकुल आहे. हे संकुल शैक्षणिक व सामाजिक तीर्थक्षेत्र बनले आहे. कर्मवीर आण्णांच्या जन्मगावी रयत शिक्षण संस्थेने सुमारे पाच एकर जागेत आदर्शवत स्मारक उभे केले आहे. या स्मारकात अण्णांचा जीवनपट मांडला आहे. नुकतेच खासदार शरद पवार यांच्याहस्ते सुसज्ज अध्यासन केंद्राचे उद्‌घाटन झाले आहे.

अध्यासन केंद्राच्या तळ मजल्यावर २५० आसन क्षमता असलेल्या ॲकॉस्टिक सभागृह उभारले आहे. पहिल्या मजल्यावर कर्मवीर संग्रहालय आहे. यामध्ये आण्णांच्या जन्मापासून अखेरच्या क्षणापर्यंत मागोवा घेतला आहे. येथे त्यांच्या वापरातील अनेक वस्तू जतन करून ठेवल्या आहेत.

याबरोबरच जीवनपट उलगडणाऱ्या चित्रमय संग्रहालय साकारले आहे. याबरोबरच डॉमेटरी इमारत, सौ. लक्ष्मीबाई पाटील स्मृती उद्यान, कर्मवीर व सौ. लक्ष्मीबाई पाटील स्मृती भवन, कर्मवीर आण्णा व सौ. लक्ष्मीबाई पाटील यांचे पूर्णाकृती पुतळे याबरोबरच पब्लिक स्कूलची इमारत विद्यार्थ्यांबरोबरच रयतप्रेमींना भुरळ घालत आहे.  

Web Title: Tourists spot Bahubali in Kolhapur District

टॅग्स