रिकामा ट्रॅक्टर घेऊन गावाकडे निघाला अन् वाटेतच चालकाला मृत्यूने गाठले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

पंकज ट्रॅक्‍टरच्या स्टेरिंगवरून मागील ट्रॉलीच्या चाकाखाली पडला.

मांगले (सांगली) : कांदे ते मांगले दरम्यान कारपेटीजवळ भरधाव वेगाने चाललेला ट्रॅक्‍टर बाजूच्या नाल्यात घसरून झालेल्या अपघातात पंकज संजय काळेल (वय21, वळई (ता. म्हसवड, जि. सातारा) या ट्रॅक्‍टर चालकाचा त्याच्याच ट्रॉलीच्या चाकाखाली आल्यामुळे जागीच मृत्यू झाला. ही घटना बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील उदय सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उतरून पाठीमागे येताना बुधवारी पहाटे घडली. 

शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की मांगले-कांदे दरम्यान कारपेटीजवळ बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील उदय सहकारी साखर कारखान्यांकडून ऊस उतरून रीकामा टॅक्‍टर घेऊन ऐतवडे (खुर्द, ता. वाळवा) गावाकडे निघालेला ट्रॅक्‍टर मृत पंकज काळेल ट्रॅक्‍टर चालवत होता. ट्रॅक्‍टरवरील वेगाचे नियंत्रण सुटल्यामुळे विरूद्ध बाजूच्या खोल नाल्यात ट्रॅक्‍टर गेला. पंकज ट्रॅक्‍टरच्या स्टेरिंगवरून मागील ट्रॉलीच्या चाकाखाली पडला. नाल्यात गवत असल्यामुळे सकाळी आठपर्यंत फक्त ट्रॅक्‍टर नाल्यात पडल्याचे दिसत होते. 

हेही वाचा - जे ओबीसींना ते मराठ्यांना द्या म्हणत चंद्रकांत पाटीलांनी सरकारवर टिकेचे उडवले झोड -

काही वेळाने काही प्रवाशांनी बारकाईने पाहिल्यानंतर ट्रॉलीच्या चाकाजवळ गवतात फक्त पाय दिसत होते. डोके व धड ट्रॉलीच्या चाकाखाली होते. दरम्यान, सकाळी आठच्या सुमारास पोलिसांना घटनेची खबर मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृत पंकजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शिराळा येथे नेण्यात आला. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्‍टर पोलीस ठाण्याकडे नेला. पंकज आनंदा नामदेव काळेल यांचा चालक म्हणून काम करीत होता. पंकजचे नातेवाईक अपघाताच्या ठिकाणी आले. मृतदेह बघून नातेवाईकांनी हंबरडा फोडला.  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tractor driver dead accident in mangle sangli