शिक्षक संघटनेत 50 वर्षांपासून फुटीची परंपरा

शांताराम पाटील 
Friday, 11 December 2020

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेत गेल्या 50 वर्षांपासून पद, पैसा, वर्चस्व यावरून सुरू असलेल्या फुटीचा व हकालपट्टीचा आदर्श माजी आमदार स्व. शिवाजीराव पाटील यांच्या अनुयायांनीही पुढे चालू ठेवला.

इस्लामपूर  : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेत गेल्या 50 वर्षांपासून पद, पैसा, वर्चस्व यावरून सुरू असलेल्या फुटीचा व हकालपट्टीचा आदर्श माजी आमदार स्व. शिवाजीराव पाटील यांच्या अनुयायांनीही पुढे चालू ठेवला. आचार्य दादासाहेब दोंदे, प्रा. अरुण दोंदे, शिवाजीराव पाटील, संभाजीराव थोरात व्हाया माधवराव पाटील व धैर्यशील पाटील असे या संघटनेचे नेतृत्व केलेल्या नेत्यांची नावे आहेत. संघटनेत वर्चस्व कोणाचे या एकमेव मुद्द्यावर आजपर्यंत अनेकवेळा फूट पडली. याला शिवाजीराव पाटील यांचे नातेवाईकसुद्धा अपवाद ठरले नाहीत. 

सुमारे 3 ते 4 लाख प्राथमिक शिक्षकांचे संघटन असलेली राज्यातील एकमेव मोठी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडे पाहिले जाते. या संघटनेची स्थापना आचार्य दादासाहेब दोंदे यांनी 1914 मध्ये केली. त्यावेळी या संघटनेचे नाव मुंबई इलाका प्राथमिक शिक्षक संघ असे होते. दादासाहेब दोंदे यांच्याबरोबर आचार्य भिसे, आचार्य अत्रे, पुणे येथील डॉ. ग. श्री. खैर हे संघटनेत आघाडीवर होते. त्यानंतर या संघटनेची धुरा आचार्य दोंदे यांचे सुपुत्र प्रा. अरुण दोंदे यांच्याकडे गेली. 

राज्यभरात संघटनेची व्याप्ती वाढली. पश्‍चिम महाराष्ट्रातून शि. द. पाटील हे संघटनेवर काम करू लागले. संघटनेचे नेतृत्व हे प्राथमिक शिक्षकाकडेच असावे यातून शि. द. पाटील व अरुण दोंदे यांच्यात वाद झाला. अरुण दोंदे हे प्राध्यापक असल्याने शि. द. पाटील यांनी संघटनेत बंड करून 1978 ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ स्थापन केला. या संघाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. 
शिक्षकांचे अनेक प्रश्‍न अधिवेशनाच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडून सोडवून घेण्यात शि. द. पाटील यशस्वी झाले. शि. द. पाटील यांचे शिष्य संभाजीराव थोरात हे संघटनेत शि. द. पाटील यांच्याबरोबर आघाडीवर काम करू लागले. संघटनेचा वाढता दबदबा पाहून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संघटनेला म्हणजेच संघटनेचे नेते शि. द. पाटील यांना दोनवेळा विधानपरिषदेवर संधी दिली. 

या काळात प्राथमिक शिक्षक संघाचा तत्कालीन राज्य सरकारवर मोठा प्रभाव होता. संघटनेचे वाढते स्वरूप व असलेल्या दबदब्यातून परत शि. द. पाटील व संभाजीराव थोरात या गुरु-शिष्यात वितुष्ट निर्माण झाले. या दरम्यान शि. द. पाटील यांनी माध्यमिक शिक्षक असलेले आपले सुपुत्र माधवराव पाटील यांना पदवीधर मतदारसंघात संघटनेचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे केले. 14 सप्टेंबर 2008 ला संभाजीराव थोरात यांनी शि. द. पाटील यांच्या विरोधात बंड पुकारले. 

संघटनेत उभी फूट पडली. शि. द. पाटील यांची वेगळी व संभाजीराव थोरात यांची वेगळी संघटना शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी काम करू लागली. या दरम्यान पैसा, पद व भानगडी बाहेर काढून दोन्ही बाजूंकडून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. याचा नेमका फायदा शासनात काम करणाऱ्या धुरंधर नेत्यांनी उचलला व महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेची धार बोथट झाली. शि. द. पाटील यांनी आपले सुपुत्र माधवराव पाटील यांना संघटनेचे राष्ट्रीय पातळीवरील फेडरेशनचे अध्यक्ष केले. या दरम्यान नातू धैर्यशील पाटील ही संघटनेत कार्यरत झाले. त्यांनाही जुन्या पेन्शन योजनेचे अध्यक्षपद देण्यात आले.

16 डिसेंबर 2019 रोजी माजी आमदार शि. द. पाटील यांचे निधन झाले. सुपुत्र माधवराव पाटील व धैर्यशील पाटील हे संघटनेचे काम पाहू लागले. मात्र एक वर्षाच्या आतच माधवराव व धैर्यशील यांच्यात फूट पडली. 1978 पासून शिक्षक संघटनेत वर्चस्व वादावरून सुरू असलेले बंड शि. द. पाटील यांच्या घरात सुद्धा शमले नाही. प्राथमिक शिक्षकांचे मूलभूत प्रश्‍न व अडीअडचणी या अलीकडच्या काळात बाजूला पडल्या असून, सत्ता व पद यासाठी सुरू असलेला संघर्ष शि. द. पाटील यांच्यात घरापर्यंत पोहोचला आहे. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tradition of splitting in the teachers union for 50 years