सोलापुरात सुप्रिया सुळे यांच्या वाहनावर दंडात्मक कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

कार्यक्रमाच्या आयोजकांनी, कार्यकर्त्यांनी वाहन पार्किंगची व्यवस्था करणे आवश्‍यक होते. सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. नो पार्किंग परिसरात वाहतूकीला अडथळा होत असल्याने 11 वाहनांवर नियमाप्रमाणे दोनशे रुपये कारवाई केली आहे. 
- संजीव भोसले, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा 

सोलापूर : डफरीन चौकात रस्त्यावर वाहने लावून वाहतूकीला अडथळा केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री दंडात्मक कारवाई केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी सायंकाळी आयएमए हॉलमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा संवाद ताईंशी हा कार्यक्रम आयोजिला होता. कार्यक्रमासाठी आलेल्या पदाधिकारी आणि शहरातील मान्यवरांची वाहने रस्त्यावर लावली होती. यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाचाही समावेश होता. वाहतूकीला अडथळा होत असल्याच्या कारणावरून शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संजीव भोसले आणि त्यांच्या पथकाने वाहनांवर कारवाईला सुरवात केली. खासदार सुळे यांच्या वाहनावरही नियमाप्रमाणे दोनशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि इतर एकूण 11 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

कार्यक्रमाच्या आयोजकांनी, कार्यकर्त्यांनी वाहन पार्किंगची व्यवस्था करणे आवश्‍यक होते. सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. नो पार्किंग परिसरात वाहतूकीला अडथळा होत असल्याने 11 वाहनांवर नियमाप्रमाणे दोनशे रुपये कारवाई केली आहे. 
- संजीव भोसले, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहन चालकास आतमध्ये हॉलसमोर वाहन घेण्यास सांगितले होते, पण वाहन रस्त्यावर असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. इतरही वाहनांवर कारवाई झाली आहे. नियम तोडल्यामुळे सर्वांनी दंड भरला आहे. 
- संतोष पवार, कार्याध्यक्ष, शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic police fine on MP Supriya Sule car in Solapur