वाहतूक नियमभंगाची तक्रार करा ‘वॉटस्‌ ॲप’ वर - अतुल निकम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

सांगली - वाहतुकीचे नियम जर कोणी राजरोस मोडत असेल, तर तुमच्या स्मार्ट फोनच्या कॅमेऱ्यात त्याला टिपा. सांगली वाहतूक नियंत्रण शाखेच्या ‘वॉटस्‌ ॲप’ क्रमांकावर थोडक्‍यात हकीकत, ठिकाण आणि फोटो ‘पोस्ट’ करा. त्यानंतर संबंधिताचा पत्ता मिळवून त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती सांगली वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक निरीक्षक अतुल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

श्री. निकम म्हणाले, ‘‘पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सांगली वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम आणि सुधारणा घडवून आणल्या जात आहेत. चांगल्या रस्त्यांवर पांढरे पट्टे मारून वाहनधारकांमध्ये शिस्त आणली जात आहे. सुधारित दंडानुसार कारवाई केली जात आहे. आम्हाला केसेसचे टार्गेट पूर्ण करायचे नसून शिस्त निर्माण करायची आहे. जानेवारी महिन्यात ५२०६ केसेस करण्यात आल्या.

फेब्रुवारीमध्ये ३६८३ केसेस करण्यात आल्या. तसेच ड्रंक अँड ड्राईव्हच्या ११० केसेस केल्या. ९ लाख  ७४ हजार रुपये दंड वसूल केला. कारवाईचे प्रमाण कमी झाल्यामुळे वाहनधारक थोडीफार शिस्त बाळगत असल्याचे दिसते.’’
ते म्हणाले,‘‘फेब्रुवारीमध्ये फॅन्सी नंबरप्लेटच्या २३५ केसेस करून ४८७०० रुपये दंड केला. 

ट्रिपल सीटच्या २१८ केसेस करून ४४१०० रुपये दंड केला. वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी वॉटस्‌ ॲप क्रमांक जाहीर केला आहे. संबंधिताचे छायाचित्र तुमच्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपून थोडक्‍यात हकीकत, ठिकाण पोस्ट करा. संबंधित प्रकार सांगली परिसरातील असावा. वॉटस्‌ ॲपवर तक्रार आल्यानंतर वाहतूक पोलिस संबंधिताचा पत्ता, क्रमांक शोधून थेट कारवाई करतील. त्यासाठी आरटीओ कार्यालयाची मदत घेतली जाईल.’’

येथे तक्रार करा
वाहतूक नियमभंगाची तक्रार करण्यासाठी वॉटस्‌ ॲप क्रमांक ८८३००८०९५१ या क्रमांकावर छायाचित्र आणि तक्रार लिहा. तसेच तक्रार करणाऱ्याने स्वत:चे नावही लिहावे. त्यानंतर वाहतूक पोलिस कारवाईसाठी पाठपुरावा करतील. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची ‘ब्लॅक लिस्ट’ बनवली जाईल. संबंधित पुन्हा सापडले  तर कठोर कारवाई केली जाईल, असे श्री. निकम यांनी सांगितले.

Web Title: traffic rules complaint on whatsapp