
शहरात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी कुठलेही साधन नाही. त्यामुळे आमराई उद्यानात बसवण्यात येणाऱ्या मिनी रेल्वेमुळे बालकांना रेल्वेत बसण्याचा आनंद मिळणार आहे.
सांगली : शहरात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी कुठलेही साधन नाही. त्यामुळे आमराई उद्यानात बसवण्यात येणाऱ्या मिनी रेल्वेमुळे बालकांना रेल्वेत बसण्याचा आनंद मिळणार आहे. या रेल्वेमुळे आमराईच्या मूळ रचनेला कसलाही धक्का लागू देणार नाही. आमराईतील एकही झाड यासाठी बळी जाणार नाही असे स्पष्टीकरण नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी दिले.
नगरसेविका सौ. निंबाळकर म्हणाल्या, माझ्याच प्रभागात आमराई आहे. महापालिकेने आमराईचे सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी सुशोभिकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. आमराई नैसर्गिक उद्यान आहे. तेथे विविध प्रकारची वृक्षराजी आहे. त्यामुळे या ठिकाणी सांगलीकर मोठ्या संख्येने व्यायामासाठी येतात. शिवाय लहान मुलांना घेऊन वनभोजन आणि खेळण्यासाठीही सहकुटुंब नागरिक येत असतात. या लहान मुलांच्या आनंदात भर टाकण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी तेथे उद्यान रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या म्हणाल्या, या उद्यान रेल्वेसाठी अवघी 250 ते 300 मीटर इतकीच जागा वर्तुळाकार ट्रॅकसाठी लागणार आहे. शिवाय छोटा प्लॅटफॉर्म, उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. मात्र त्यामुळे आमराईतील वृक्षराजीला धक्का बसू देणार नाही. तशी अटही ठेकेदासाठी घालण्यात आली आहे. आयुक्तांनीही या मिनी रेल्वेसाठी झाडे काढावी लागणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे. आमराईच्या एका बाजूला ही रेल्वे बसवण्यात येईल. त्यामुळे मुलांनाही त्याचा आनंद लुटता येणार आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार