सांगलीत कोरोना संकटात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा ः खासदार संजय पाटील यांची आक्रमक मागणी 

अजित झळके
Monday, 10 August 2020

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण गतीने वाढत आहेत. दहा दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. या स्थितीत जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. जिल्हाधिकारी, महापालिकाचे आयुक्त, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यापासून याला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा, अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

सांगली ः जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण गतीने वाढत आहेत. दहा दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. या स्थितीत जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. जिल्हाधिकारी, महापालिकाचे आयुक्त, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यापासून याला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा, अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. कोरोनाच्या संकटात प्रशासनाने कोणताही समन्वय राखला नसल्याबाबत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

ते म्हणाले, ""या संकटात राजकारण अजिबात करायचे नाही, मात्र जे काही घडते आहे ते गंभीर आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याबाबत कोणतेही ठोस नियोजन नाही. रुग्णसंख्या वाढत असताना ज्यांना त्रास नाही, अशांना घरीच ठेवणे गरजेचे आहे. केवळ गंभीर आजारी लोकांना रुग्णालयात न्यायला हवे. दिल्लीत हा पॅटर्न यशस्वी झाला आहे. तो इथे राबवायला हवा. त्याउलट आता प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात नेले जात आहे. कारण, लोकांचाही या व्यवस्थेवर विश्‍वास नाही. घरी थांबलो आणि अचानक त्रास सुरु झाला तर वेळेत उपचार मिळतील का? रुग्णवाहिका वेळेत येईल का, याबद्दल लोकांना विश्‍वास नाही. त्याचा हा परिणाम आहे. हे प्रशासनाचे अपयश आहे. आजवर दहा ते बारा बैठका झाल्या, आम्हाला फक्त दोन-तीन वेळा बोलावण्यात आले. कुणालाही विश्‍वासात घेतले जात नाही. कंटेन्मेंट झोनच्या नावाखाली सारा गोंधळ सुरु आहे. नेमका काय प्रकार आहे, त्यावर कुणाचे नियंत्रण नाही.'' 

ते म्हणाले, ""एक खासगी डॉक्‍टर पंधरा दिवसांत रुग्णालय उभे करतो, मग शासकीय यंत्रणेला हे का शक्‍य नाही. मी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्‍विनकुमार चोंबे यांच्याशी बोबलो आहे. केंद्रीय समिती लवकरच पश्‍चिम महाराष्ट्राचा दौरा करेल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer the officers who failed in Sangli Corona crisis: MP Sanjay Patil's aggressive demand