सांगली उपजिल्हाधिकाऱ्यांसह चार तहसीलदारांच्या बदल्या

विष्णू मोहिते
Saturday, 3 October 2020

राज्य सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांसह चार तहसीलदारांच्या बदल्या आज झाल्या.

सांगली ः राज्य सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांसह चार तहसीलदारांच्या बदल्या आज झाल्या. सांगली आणि संखमध्ये अप्पर तहसीलदार, तर मिरज व पलूस येथे नवीन तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

काही दिवसांपासून राज्य शासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. यानुसार महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

संखचे अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांची बदली झाली आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार एच. आर. मेहेत्रे यांची नियुक्ती झाली. मिरजेचे तहसीलदार रणजित देसाई यांची सातारा येथे संजय गांधी योजनेच्या तहसीलदारपदी बदली झाली. त्यांच्या जागेवर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचे तहसीलदार दगडू कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार रामलिंग चव्हाण यांची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली. त्यांच्या जागेवर खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पलूसचे तहसीलदार आर. आर. पोळ यांची जावळीला तहसीलदार म्हणून बदली झाली. त्यांच्या जागेवर पुणे येथील विशेष कार्यकारी दंडाधिकारी निवास ढाणे यांची नियुक्ती झाली. आत्ता येथील अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांची बार्शी तहसीलदारपदी बदली झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अश्विनी वरुटे यांची भुदरगड येथे तहसीलदारपदी, तर महसूल तहसीलदार चंद्रशेखर सानप यांची माणच्या तहसीलदारपदी बदली झाली. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of four Tehsildars including Sangli Deputy Collector