महापालिका शाळा क्रमांक 7 चा कायापालट

घनशाम नवाथे 
Thursday, 4 February 2021

सध्या बहुतांश महापालिका शाळा म्हणजे मळक्‍या भिंती...सर्वांचेच दुर्लक्ष... यामुळेच शहरातील कित्येक शाळा बंद पडल्या असून काही शाळा त्या वाटेवर आहेत. अशातच सांगली शहर स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांनी महापालिका शाळा क्रमांक 7 दत्तक घेऊन शाळेचा लोकसहभागातून शाळेचा कायापालट केला आहे.

सांगली : सध्या बहुतांश महापालिका शाळा म्हणजे मळक्‍या भिंती...सर्वांचेच दुर्लक्ष... यामुळेच शहरातील कित्येक शाळा बंद पडल्या असून काही शाळा त्या वाटेवर आहेत. अशातच सांगली शहर स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांनी महापालिका शाळा क्रमांक 7 दत्तक घेऊन शाळेचा लोकसहभागातून शाळेचा कायापालट केला आहे. शाळेची आतून बाहेरून रंगरंगोटी तसेच वर्गखोल्या, कंपाऊंडवर बोलक्‍या भिंती साकारण्याचे काम अत्यंत नाविन्यपूर्ण साकारण्यात आले आहेत. 

आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, सभागृह नेते विनायक सिंहासने, उपायुक्त राहुल रोकडे आदिनी भेट देऊन राकेश दड्डणावर व निर्धार फौंडेशनने केलेल्या कामाचे कौतुक केले. 

आमदार गाडगीळ म्हणाले, ""प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून आज राकेश दड्डणावर व टीमने एका संपूर्ण शाळेचा केलेला कायापालट हे कौतुकास्पद आहे. युवकांनी ठरवले तर काय घडू शकते हे राकेश व टीमने दाखवून दिले आहे. त्यांचा शहरातील युवकांनी आदर्श घ्यावा.'' 

दड्डणावर म्हणाले, ""एकदा शाळेमध्ये स्वच्छतेसाठी गेलो असता अवस्था पाहिली. शाळेत विद्यार्थ्यांचा पट इतर मनपा शाळेच्या मानाने चांगला होता. त्यामुळे आम्ही ही शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.'' 

महापौर सुतार म्हणाल्या, ""राकेश व टीमचे कार्य अभिनंदनीय असून पुढील काळात महानगरपालिकेकडून शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करू.'' नगरसेवक संजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते, गुराण्णा बगले, सचिन भोसले, प्रतिभा गडदे आदींसह शिक्षक व निर्धार फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transformation of Municipal School No. 7