सांगलीत वाहतूक शाखेचा इशारा "नो मास्क-नो सवारी' 

शैलेश पेटकर 
Tuesday, 29 September 2020

कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सर्वच पातळीवरून प्रयत्न केले जात आहे. सूचना देऊनही खबरदारीच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे वाहतूक शाखेने "नो मास्क, नो सवारी'चा उपक्रम हाती घेतला आहे.

सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सर्वच पातळीवरून प्रयत्न केले जात आहे. सूचना देऊनही खबरदारीच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे वाहतूक शाखेने "नो मास्क, नो सवारी'चा उपक्रम हाती घेतला आहे. रिक्षा, वडाप, एसटींवर फलक झळकवत कारवाईचा इशारा दिला. वाहतूक शाखेच्या या मोहिमेला प्रतिसाद दिला. 

पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनानुसार उपाधीक्षक अशोक वीरकर यांच्या हस्ते आज पुष्पराज चौकात या मोहीमेस प्रारंभ झाला. वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अतुल निकम, रिक्षा संघटनेचे महादेव पवार, फिरोज मुल्ला, रामभाऊ पाटील उपस्थित होते. 

लॉकडाउन संपल्यानंतर आर्थिक चक्र सुरळीत होण्यासाठी सर्वच व्यवहार अनलॉक अंतर्गत सुरू झाले. त्यामुळे शहरात आणि परिसरात गर्दी होऊ लागली. साहजिकच सर्वांचेच खबरदारीच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे महिन्याभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली. संसर्ग रोखण्यासाठी पोलिस दलाकडून कारवाईही करण्यात आली. त्यानंतर आता "नो मास्क, नो सवारी' चा उपक्रम हाती घेतला आहे. रिक्षा आणि वडाप सुरू झाल्यानंतर त्याठिकाणी प्रवाशी आणि चालकाने घ्यावयाची काळजी याविषयी प्रबोधन करण्यात आले. श्री. वीरकर म्हणाले,""रिक्षा, वडाप यांनी सुरक्षितता बाळगावी. जे कोरोना नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.'' 

पुष्पराज चौकात आज सायंकाळी सर्वच रिक्षा आणि वडापवर हे फलक लावण्यात आले. रिक्षा संघटनेकडून माफक दरात सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचेही उद्‌घाटन करण्यात आले. पोलिसांच्या या मोहिमेस साऱ्यांनीच उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transport Branch warns "No mask-no ride"