गणेशोत्सवानिमित्त इचलकरंजी शहरात अशी असेल वाहतूक व्यवस्था 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - श्री गणेशोत्सवानिमित्त इचलकरंजी शहरात भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी 12 सप्टेंबरपर्यंत सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये शहरात वाहतूक नियमन आदेश जारी केला आहे. 

कोल्हापूर - श्री गणेशोत्सवानिमित्त इचलकरंजी शहरात भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी 12 सप्टेंबरपर्यंत सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये शहरात वाहतूक नियमन आदेश जारी केला आहे.  या आदेशानुसार घरगुती गौरी गणपती विसर्जन करिता 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पासून ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत तसेच 12 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त विसर्जनासाठी सकाळी 8 वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत काही मार्ग खुले व काही मार्ग बंद करण्यात येत आहेत. 

आठ ते अकरा सप्टेंबर दरम्यान हे रोड राहणार बंद

गणेश उत्सव कालावधीत देखावे पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे वाहनांची कोंडी होवू नये म्हणून मुख्य रस्त्यावर 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी चारपासून गर्दी संपेपर्यंत या वेळेमध्ये एस. टी. बस, अवजड वाहने व मालवाहू टेम्पो यांना राजवाडा चौक - गांधी पुतळा - जनता चौक  - हवामहल चौक व शिवाजी पुतळा ते जनता चौक - गांधी पुतळा - झेंडा चौक तसेच संभाजी चौक ते शिवाजी पुतळा जाणाऱ्या रोडवर बंद करण्यात येत आहे. 

गणपती विसर्जन मुख्य मार्ग असा - 

गणपती विसर्जन मुख्य मार्ग शाहू पुतळा, शिवाजी पुतळा, जनता चौक, गांधी पुतळा, नारायण टॉकीज, झेंडा चौक, रसना कॉर्नर, गुजरी पेठ, मरगुबाई मंदिर चौक मार्गे पंचगंगा नदीघाट असा आहे. या जोडमार्गाने मिरवणुकीच्या मार्गावर येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहील.

अशी असेल सांगली मिरज वाहतूक 

सांगली मिरजहून येणारी वाहतूक सांगली नाका, महासत्ता चौक, लालनगर चौक, थोरात चौक, आंबेडकर पुतळा मार्गे एस. टी. स्टॅंड व शाहू पुतळ्याकडे येईल व सांगली मिरजकडे जाणारी वाहतूक याच मार्गाने परत जाईल.

अशी असेल कागल, हुपरी मार्ग वाहतूक

कागल, हुपरी, रेंदाळ व रांगोळीमार्गे इचलकरंजीस येणारी वाहने पट्टणकोडोली, इंगळी, रूई पुल - रूई फाटा, कबनुर मार्गे येतील व त्याच मार्गे परत जातील.

अशी असेल कुरूंदवाड, कर्नाटकातून येणारी वाहतूक

कुरूंदवाड, बोरगाव, कर्नाटकातून इचलकरंजीकडे येणाऱ्या वाहनांना शिरदवाडपासून पुढे येण्यास पुर्णत: बंदी राहील. ही वाहने शिरवादवाडकडून अब्दुललाट, हेरवाड, कुरूंदवाड शिरढोण, टाकवडेवेस, महासत्ता चौक, थोरात चौक, आंबेडकर पुतळा मार्गे इचलकरंजी शहरात येतील व त्याच मार्गाने परत जातील. 

विसर्जनानंतर रिकाम्या वाहनांसाठी मार्ग असा -

गणपती विसर्जन झाल्यानंतर रिकामी वाहने पंचगंगा पुल, नदी नाका, लक्ष्मी मंदिर, शेळके मळा, एम. एस. ई. बी. चौक, रिंगरोडने लिंबू चौक, कलानगर चौक, पंचवटी टॉकीजमार्गे शाहू पुतळ्याकडे येतील. तसेच पंचगंगा पुल, वरद विनायक मंदिर, जॅकवेल, शेळके मळा, एम. एस. ई. बी. चौक, कृष्ण कॉम्पेल्स चौक,  वैरण बाजार, उत्तम प्रकाश टॉकीज, संभाजी चौक, तीनबत्ता चौक, पंचवटी टॉकीज मार्गे शाहू पुतळ्याकडे येतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: transportation system in Ichalkaranji city During the Ganesh Festival period