सावधान... दिवाळीत सायबर गुन्हेगारांचा ट्रॅप; पोलिस दप्तरी कच्च्या तक्रारींचा ढिग 

जयसिंग कुंभार
Wednesday, 11 November 2020

दिवाळीच्या खरेदीच्या उत्साहात ऑनलाईन शॉपिंग वाढले आहे. या माहौलाचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचे अनेक फंडे आणले असून त्यातून लाखो रुपयांना गंडा घातला जात आहे. 

सांगली ः गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या खरेदीच्या उत्साहात ऑनलाईन शॉपिंग वाढले आहे. इंटरनेटच्या या महाजाळ्यात अनेक ई-कॉमर्स कंपन्या वेबसाइट्‌सच्या मध्यमातून आपल्या विविध ऑफर्स घेऊन येतात. मात्र नेमक्‍या याच माहौलाचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचे अनेक फंडे आणले असून त्यातून लाखो रुपयांना गंडा घातला जात आहे. 

ऑनलाईन शॉपिंगमध्ये सारा व्यवहार व्हर्च्युअली असतो. त्याचा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेत सणासुदीत फसवणुकीचे मोठे जाळे टाकले आहे. त्यामुळे सध्या तुमच्या मोबाईलवर असे ढिगाने मेसेज पडत आहेत. या जाळ्यात केवळ नागरिकच नव्हे तर व्यापारीही फसले आहेत. 

सध्या प्रचलित फंड्यातून या गुन्हेगारांची एक समान पध्दती दिसून येते. सोशल मीडियाद्वारे एक लिंक पाठवून किंवा 5 -10 रु डीपॉझिट करण्यात येतात आणि त्यानंतर अकाऊंटची माहिती घेऊन फसवणुक केली जाते. तसेच वस्तुंची मोठी ऑर्डर देऊन व्हॉट्‌सअपवरुन क्‍युआर (QR) कोड पाठवून सदर कोड स्कॅन करुन फसवणूक केली जाते. 

OLX वरुन खरेदी विक्रीसाठी पेमेंट डीटेल्स मागवून वस्तू न पाठविता पैसे उकळण्याच्या क्‍लुप्त्या किंवा पैसे टाकतो असे सांगत तुमच्याच खात्यावरून परस्पर पैसे ट्रान्स्फर करणे, सैनिक आहोत असे सांगत फसवणूक करणारे भामटे हिंदीतून नम्र भाषेत संवाद साधतात आणि गंडा घालतात. फोन पे किंवा पेटीएम किंवा गुगल पे वरुन बोनस पॉइंट आपल्या खात्यामध्ये जमा करावयाचे आहेत असे सांगून "एनी डेस्क' नावाच्या ऍप फोनमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगून फोन (हॅक) करीत संपूर्ण बॅंक खातेच रिकामे केले जाते.

इमेल अथवा फोनद्वारे दिवाळीचे हॉलिडे पॅकेज ऑफर आहे म्हणून सांगत व क्रेडीट कार्डची माहिती विचारून घेणे, लॉटरीचे कोणते नंबर जिंकणार, आपण कॉन्टेस्ट जिंकले आहे मात्र आपल्याला फक्त 15,000 रु भरावयाचे आहेत अशा आशयाचे फोन करुन फसवणुक करणे, कार्ड ब्लॉक केल्याचे फोन करुन कार्डची माहिती विचारुन घेणे, बॅंकेच्या खोट्या स्किम किंवा ऑफर्सबद्दल फोन करणे किंवा मेसेज पाठविणे हे या गुन्हेगारांचे सध्याच्या सणाच्या काळातले अहोरात्र काम आहे. विविध वेबसाईटस्‌ ऑनलाईन खरेदीवर ऑफर्स देत आहे. या वेबसाईट्‌स किती खऱ्या किती खोट्या हे प्रत्येकाने तपासून व्यवहार न केल्यास फसवणूक अटळ आहे. 

क्‍यूआर कोडचा वापर टाळावा

ऑनलाईन शॉपिंगच्या विश्‍वात पदोपदी फसवणुकीचे जाळे आहे. त्यामुळे ऑफर्सबाबत कोणत्याही फोनवरून व्यवहार करु नका, माहिती देऊ नका. कॉन्टेस्ट किंवा लॉटरीसाठी अनोळखी कंपनीच्या फोनला आजिबात प्रतिसाद देऊ नका. वेबसाईटद्वारे खरेदी करताना अनोळखी किंवा नविन साईटवरुन खरेदी करु नका. आपल्या कार्ड किंवा बॅक अकाऊंट माहिती अशा वेबसाईटवर सेव्ह करु नका. व्यापा-यांनी पैसे ट्रान्स्फरसाठी शक्‍यतो इंटरनेट बॅकिंकचा वापर करावा. क्‍यूआर कोडचा वापर टाळावा. 
- विनायक राजाध्यक्ष, सायबर फॉरेंसिक तज्ज्ञ 

बॅंकेच्या पत्राची गरज नाही

सायबर फसवणुकीच्या एफआयआर त्या त्या पोलिस ठाण्यातच नोंद होतात. त्यासाठी बॅंकेच्या पत्राची गरज नाही. तक्रारदारांनी थेट द्याव्यात. तपासासाठी त्या सायबर क्राईम विभागाकडे वर्ग होतात. फसवणूक किती रुपयांची हवी अशी कोणतीही अट नाही. 
- अजित टिके, पोलिस उपाधीक्षक, सांगली शहर 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trap of cyber criminals on Diwali; A pile of raw complaints from the police docket