esakal | लेकरू पाठी बांधून हिकरणी निघाली पुण्याहून मध्य प्रदेशाकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Travel from Pune to Madhya Pradesh

पुणे येथे कर्नाटकच्या बांधकाम व्यावसायिकाकडे चार-पाच वर्षांपासून काम करणाऱ्या कुटुंबाला ठेकेदाराने 15 दिवस सांभाळले आणि तो आता पळून गेल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. शेवटी हताश झालेल्या या कुटुंबाने गावी जाण्याचा निर्णय घेतला.

लेकरू पाठी बांधून हिकरणी निघाली पुण्याहून मध्य प्रदेशाकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः लॉकडाउनमुळे शहरांसह ग्रामीण भागातीलही उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने बहुतेक सर्वच मजूर जमेल तसे, मिळेल त्या मार्गाने आपापल्या गावी परतत आहेत. एका कुटुंबाची चिमुरडीला घेऊन पुणे ते मध्य प्रदेश अशी पायी वारी निघाली आहे.

पुणे येथे कर्नाटकच्या बांधकाम व्यावसायिकाकडे चार-पाच वर्षांपासून काम करणाऱ्या कुटुंबाला ठेकेदाराने 15 दिवस सांभाळले आणि तो आता पळून गेल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. शेवटी हताश झालेल्या या कुटुंबाने गावी जाण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांपूर्वी पुण्याहून थेट मध्य प्रदेशातील आपल्या बडवानी जिल्ह्यातील कुंजरी या गावी जाण्यासाठी हे कुटुंब पायी निघाले. हे कुटुंब आज दुपारी सुपे येथे पोचले. साधारण 25 ते 30 वयोगटातील एक महिला, तीन पुरुष आणि अवघ्या चार महिन्यांची चिमुरडी यांचा हा प्रवास "अब दिल्ली दूर है' तरी जोमाने सुरू आहे. 

छोटी मुलगी पाहून सुपे येथील युवा कार्यकर्ते समीर शेख, अक्षय थोरात व अमोल मोकाटे यांनी चिमुरडीसाठी दूध पावडरचा पुडा, खोकल्याचे व तापाचे औषध दिले. त्यांना पाचशे रुपये देऊन सन्मानाने पुढे पाठवले.

अहोरात्र प्रचंड वाहनांची वर्दळ असणारा नगर-पुणे महामार्ग सुमारे 25 दिवसांपासून सुनासुना दिसत आहे. या मार्गावर दिंडी किंवा पदयात्रा वगळता पायी जाणारी माणसे कधीच दिसत नाहीत. मात्र, गेल्या 25 दिवसांपासून या रस्त्यावर माणसांची मोठी वर्दळ सुरू आहे. डोक्‍यावर बोचके, पाठीवर पिशवी, महिलेच्या कडेवर लहान मुले असे चित्र दिसत आहे. दररोज किमान तीन हजारांहून अधिक लोक या महामार्गावरून पायी जात असावेत. 

loading image