वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

गोंदवले - सामाजिक वनीकरणांतर्गत वृक्षारोपण केलेल्या झाडांचे खड्डे काही दिवसांतच झाडाविना दिसत असल्याने 13 कोटी वृक्ष लागवड योजनेचा माण तालुक्‍यात बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

गोंदवले - सामाजिक वनीकरणांतर्गत वृक्षारोपण केलेल्या झाडांचे खड्डे काही दिवसांतच झाडाविना दिसत असल्याने 13 कोटी वृक्ष लागवड योजनेचा माण तालुक्‍यात बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

वैश्‍विक उष्णतेमध्ये तापमानात होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध विभागांसह लोकसहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टामध्ये यंदा 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. मात्र, संबंधित विभागाकडून केवळ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काम करत असल्याचे दिसत आहे. माण तालुक्‍यात नुकतीच लागवड केलेली झाडे दुसऱ्याच दिवशी मोकाट जनावरांनी फस्त केली आहेत. इतकेच नव्हे तर वन विभागाच्या बेफिकिरीने चक्क जळालेली झाडेदेखील लावली जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. लागवड केलेली अनेक झाडे पाण्यावाचून जळून चालली आहेत. 

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तीन पट अधिक वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवण्यात आले असून सर्व विभागांचा सहभाग घेण्यात आला आहे. याशिवाय स्वयंसेवी संस्था आणि काही नागरिकही पुढे येत असून जुलै महिन्यात ही वृक्ष लागवड मोहीम राज्यात मोठ्या प्रमाणात यश गाठेल, असा विश्‍वास असतानाच माण तालुक्‍यात सामाजिक वनीकरण विभागाने 22 ठिकाणी 57 हजार 719 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. एक जुलैपासून वृक्षांची वन विभागाने वाजत- गाजत लागवडही केली आहे. परंतु, बेफिकिर अधिकाऱ्यांनी अपुरे खड्डे काढणे, जळालेल्या झाडांची लागवड करणे, झाडांना टी गार्ड न बसवणे, काही ठिकाणी खड्डेच न काढणे अशा अनेक बेजबाबदार कारणांनी या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे. त्याच त्या खड्ड्यांमध्ये दरवर्षी झाडे लावून शासन कोणते उद्दिष्ट साधत आहे, असा सवाल जनतेतून व्यक्त होत आहे. 

मी नुकताच कार्यभार स्वीकारला असून माझ्या काळात वृक्षारोपण झालेले नाही. 
- कौशल्या भोसले, वन क्षेत्रपाल, दहिवडी

Web Title: tree plantation scheme issue in godawale