दंगली घडविण्यामागे राजकीय नेत्यांचा हात? नितीन चौगुले : Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mob hurled stones at shops and police in malegaon in muslim community protest against tripura violence

मशीद पाडण्यात आल्याची अफवा पसरविणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे.

दंगली घडविण्यामागे राजकीय नेत्यांचा हात? नितीन चौगुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : सध्या महाराष्ट्रात ड्रग्ज प्रकरणात अनेकजण अडकत चालले आहेत. या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने चालला असताना देखील तपास भरकटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेत्यांचा हात राज्यातील काही भागात नुकत्याच झालेल्या दंगलीमागे आहे का ? याची चौकशी केंद्रीय आणि राज्य गृहखात्याने करणे गरजेचे आहे. याबाबतचे निवेदन आम्ही गृहमंत्रालयास देणार आहोत. त्याचप्रमाणे त्रिपुरात (Tripura violence) न घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात मोर्चाचे आयोजन करणाऱ्या रझा अकादमीवर तत्काळ बंदी घालून झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले (Nitin Chougale)यांनी पत्रकार बैठकीत केली.

त्रिपुरामध्ये घडलेल्या तथाकथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये उमटताना दिसत आहेत. अमरावती, नांदेड, औरंगाबादमध्ये हिंसक घटना घडल्याचे दिसून येत आहे. यात अमरातवीतमध्ये घडलेल्या हिंसाचाराने वातावरण अधिकच चिघळले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत बोलताना नितीन चौगुले म्हणाले, ही तथाकथित घटना ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस घडलेली आहे.

मशीद पाडण्यात आल्याची अफवा पसरविणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. मग महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आता मोर्चा काढण्याचे आयोजन काय ? रझा अकादमीने मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यांनी काढलेल्या मोर्चात जाळपोळ तसेच दुकानांची मोडतोड झाली आहे. यापूर्वी देखील मुंबई येथे अकादमीने मोर्चा काढला होता. त्यावेळी अमर जवानची मोडतोड करण्यात आली होती. तसेच पोलिसांवर देखील हल्ले करण्यात आले होते. त्यावेळीच या संघटनेवर बंदी घालणे आवश्यक होते.

यावेळी देखील रझा अकादमीने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. संघटनेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि झालेल्या नुकसानीची वसुली त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करावी अशी आमची भूमिका आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन शाहरुख खान हा अडकला आहे. तसेच अन्य देखील काहीजणांकडे चौकशी सुरु आहे. यामुळेच जाणीवपूर्वक या प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी दंगल घडविण्यात आली का ? या दृष्टीकोनातून देखील तपास होणे गरजेचे आहे.

दंगल हे षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्यामागील सुत्रधार कोण आहे ? याचा तपास गृहविभागाने तातडीने करावा. नजीकच्या काही दिवसात रझा अकादमीवर कारवाई न झाल्यास हिंदुचा संताप अनावर होईल याची दखल सरकारने घ्यावी. शनिवारी रझा अकादमीच्या मोर्चाला प्रतिमोर्चाने उत्तर देण्याचा प्रयत्न हिंदुनी केला असेल आणि त्याचे नेतृत्व भाजपाने केले असेल तर त्यांचे स्वागत असल्याचेही चौगुले यांनी सांगितले. याप्रसंगी आनंद चव्हाण, प्रकाश निकम, प्रशांत गायकवाड, हरिदास पडळकर आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कंगनाचा निषेध

नितीन चौगुले म्हणाले, हिंदुस्थानला मिळालेल्या स्वातंत्र्यासंदर्भात अभिनेत्री कंगना राणावत यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. क्रांतिकारकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्यामुळे कंगनाने या सर्वांचा अपमान केला आहे.

loading image
go to top