esakal | करोली म्हैसाळच्या कुटुंबांचा सत्यशोधक विवाहाचा आदर्श
sakal

बोलून बातमी शोधा

Truth-seeking marriage witnessed by the Constitution in Karoli-Mhaisal

महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहु महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचाराने सुरु झालेल्या सत्यशोधक विवाहाची परंपरा जपली जात आहे. करोली (एम) येथे असाच कर्मकांडाला फाटा देत, संविधानच्या साक्षीने सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.

करोली म्हैसाळच्या कुटुंबांचा सत्यशोधक विवाहाचा आदर्श

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहु महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचाराने सुरु झालेल्या सत्यशोधक विवाहाची परंपरा जपली जात आहे. करोली (एम) येथे असाच कर्मकांडाला फाटा देत, संविधानच्या साक्षीने सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. ऍड. महादेव पाटील आणि स्नेहलता देशमुख यांनी शिवछत्रपतीना वंदन करुन आयुष्याची सुरवात केली. राष्ट्रमाता जिजाऊ महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना वंदन करुन आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली. 

मराठा समाजातील पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते ए. डी. पाटील यांनी पुतण्या ऍड. महादेव यांचा विवाह सत्यशोधक पध्दतीने करण्याचा निर्णय केला. शोभाताई व गोविंदराव पाटील यांचे सुपुत्र ऍड. महादेव व सौ. प्रतिभा व मारुती सावंत देशमुख (म्हैसाळ) यांची कन्या स्नेहलता यांचा विवाह सत्यशोधक पध्दतीने झाला. 

मराठा समाज, अंनिसचे कार्यकर्ते स्वागताला होते. उपस्थितांना पुरोगामी विचाराची मेजवानी देणाऱ्या महामानवांची पुस्तकांचा स्टॉल रुखवतात होता. व्यासपीठ सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारपुष्पांनी सजवलेले. पृथ्वी, आम्रवृक्ष, छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा, राजमाता जिजाऊ, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. एरव्हीच्या लग्नसोहळ्यात दिसणाऱ्या दृश्‍यापेक्षा हे चित्र वेगळे होते. मुहुर्तचा सोस नव्हता. 

इस्लामपूरचे प्रा. विजय गायकवाड यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीचा इतिहास व माहिती दिली. सत्यशोधक पद्‌धतीच्या मंगलअष्टका म्हटल्या. नेहमीच्या अक्षतांच्या जागी गुलाब पाकळ्यांचा वर्षाव झाला. संविधानची प्रत स्टॉलवरून विकत घेऊन येऊन वधु-वरांचे कार्यालयात आगमन झाले. मान्यवरांच्या उपस्थितीत विश्‍वास, प्रामाणिकपणे एकमेकाला सर्व परिस्थितीत साथ देण्याची शपथ त्यांनी घेतली. इतिहास अभ्यास, व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी प्रबोधन केले. ऍड. गोविंद पानसरे यांचे "शिवाजी कोण होता?' हे पुस्तक देऊन पालक, वीर पत्नी, सैनिक यांचा सन्मान करण्यात आला. 

गाडगेबाबा, जोतिबा, सावित्रीबाई... 
प्रा. विजयकुमार जोखे (संत गाडगेबाबा), महेश झेंडे (महात्मा जोतिबा), मंगल गायकवाड (सावित्रीबाई) हे खास वेषभुषा करून वधू-वरास आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. 

संपादन : प्रफुल्ल सुतार