अठ्ठावीस दिवस व्यवहार बंद; पुन्हा भितीचे वातावरण... वाचा या गावाची झालीय स्थिती

संजय कुंभार
Saturday, 11 July 2020

दुधोंडी येथे वसंतनगरमध्ये क्वारंटाईन असलेल्या आणखी सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दोन दिवस सुटकेचा निश्वास सोडलेल्या ग्रामस्थांत पुन्हा भितीचे वातावरण पसरले.

दुधोंडी (जि. सांगली) ः येथे वसंतनगरमध्ये क्वारंटाईन असलेल्या आणखी सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दोन दिवस सुटकेचा निश्वास सोडलेल्या ग्रामस्थांत पुन्हा भितीचे वातावरण पसरले. आणखी 28 दिवस अत्यावश्‍यक सेवा वगळता रस्ते व इतर व्यवहार बंद राहणार आहेत. 

मंगळवारी एकाचवेळी पाच जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. नागरिकांत भीतीचे वातावरण होते. त्या पाच जणांच्या संपर्कातील 70 जणांना पलूस येथे क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचा स्वॅब घेण्यात आला. दोन दिवसांत त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त जणांचे अहवाल निगेटिव्हे आल्याने दिलासा मिळाला. मात्र शुक्रवारी दुपारी सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्हे आल्याने सुटकेचा निश्वास सोडलेल्या नागरिकांतून पुन्हा भीतीचे वातावरण पसरले. सहा जणांपैकी दोन पुरुष, एक महिला, एक मुलगी, दोन मुलांचा त्यात समावेश आहे. सहापैकी पाच जण एकाच कुटुंबातील आहेत. एक जण परिसरातील आहे. 

दरम्यान, पुन्हा सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजतात तहसीलदारांसह आरोग्य विभागाचे कोरोना योद्धे सरपंच विजय आरबुने, डॉ. नागराज रानमाळे यांनी त्वरीत धाव घेतली. येथील रुग्णांची संख्या 24 वर गेली आहे. 24 पैकी तीन जणांना घरी सोडण्यात आले. 21 जणांवर मिरज व पलूस येथे उपचार सुरू आहेत. 

बंदोबस्तात वाढ 
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असल्याने कुंडलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता माने, तलाठी सौ. एस. एस. पाटील, ग्रामसेवक मिलिंद आपटे यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला. विना मास्क, नियम उल्लंघणाऱ्या, दुचाकीवरून फिरणाऱ्यांसह नागरिकांना दंड करण्याची मोहिम सुरू केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty-eight days all transaction closed; Now again the atmosphere of fear ... Read the story of this village