सराईत बनला 'आमदार'; लोकांना घालतोय गंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

 लिलावातील घेतलेल्या गाड्या विकत द्यायच्या असून, त्यात भरघोस सुट देण्याच्या बतावणीला बळी पडून एकाची बावीस लाखाची फसवणूक झाली. अजय शेळके (रा. तांदळी, ता. श्रीगोंदे) असे फिर्यादीचे नाव असून, त्याला प्रसादकुमार उर्फ बबलू जठार (लोणी व्यंकनाथ) याने गंडा घातला. पोलिसांनी याप्रकरणी बबलू याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. 

श्रीगोंदे  (नगर): लिलावातील घेतलेल्या गाड्या विकत द्यायच्या असून, त्यात भरघोस सुट देण्याच्या बतावणीला बळी पडून एकाची बावीस लाखाची फसवणूक झाली. अजय शेळके (रा. तांदळी, ता. श्रीगोंदे) असे फिर्यादीचे नाव असून, त्याला प्रसादकुमार उर्फ बबलू जठार (लोणी व्यंकनाथ) याने गंडा घातला. पोलिसांनी याप्रकरणी बबलू याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. 

तपासी अधिकारी उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर म्हणाले की, शासकीय अधिकारी असल्याचे भासवून तोतयागिरी करणाऱ्या व बनावट शासकीय ओळखपत्र बनवून त्याचा गैरवापर करणारा बबलू हा सराईत आहे. त्याच्याकडे मिळालेल्या बनावट ओळखपत्रावर अभियांत्रिकी सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीगोंदे असे लिहिलेले असून, शिक्का व महाराष्ट शासन अशा आशयाचे ओळखपत्र मिळाले आहे. तसेच त्याच्याकडून एक मोटार जप्त करण्यात आली असून, त्यावर आमदार व विधानसभा सदस्य अशी स्टिकर्स मिळाली आहेत. ताे आपल्या गाडीला ही  स्टिकर्स लावून फिरत असे.

या प्रकरणाची माहिती अशी की, अजय शेळके याच्याशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख वाढविली. आरोपी बबलू याने एका फाईनान्स कंपनीच्या लिलावातून घेतलेल्या मोटारी विकायच्या असल्याचे सांगितले. त्यासाठी काही छायाचित्रे त्याला टाकताना काही सुट देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी अजय हा तालुक्यातीलच असल्याने आरोपी फसविल असे न वाटल्याने भुलला आणि त्याने ४ जूलै २०१९ नंतर वेळोवेळी गाड्या घेण्यासाठी बबलूच्या खात्यावर जवळपास बावीस लाखाची रक्कम बँकेतून पाठविली.

गाड्या देण्याची मुदत संपल्यानंतरही गाड्या मिळत नसल्याने अजय याने बबलूकडे गाड्या दे अथवा पैसे परत कर असा तगादा लावला. मात्र काही ना काही कारणे देवून आरोपीने त्याला झुलवत ठेवले. अगोदर भावनिक कारणे देणाऱ्या बबलूने नंतर अजयला धमकाविण्यास सुरुवात केल्याने शेवटी अजय शेळके याने पोलिसांत फिर्याद दाखल केली.

दरम्यान, बबलू याच्यावर दुसऱ्या गुन्ह्यातील वाँरंट असल्याने पोलिसांना तो हवा होता. श्रीगोंदे पोलिसांच्या पथकाने पुण्यातून त्याला ताब्यात घेतले. आरोपीसोबत अजूनही काही सहकारी असून पोलिस त्यांचा शोध घेत असून शेळके याच्या व्यतिरिक्त बबलूने अनेकांना टोप्या घातल्याचा संशय आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty-two lakhs bucks in the name of auctioning auction