बहिणीच्या आत्महत्येचा सूड, एकाच कुटुंबातील तिघींची हत्या; दोघांना मरेपर्यंत कारावास

Two accuse gets life imprisonment in sangli hivare case
Two accuse gets life imprisonment in sangli hivare case

सांगली- संपूर्ण राज्यात गाजलेल्या हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून प्रकरणी आरोपी सुधीर सदाशिव घोरपडे (वय 24) आणि रवींद्र कदम (वय 23) या दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येकी एक लाख रूपयाचा दंडही सुनावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी. सातवळेकर यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी हा खटला चालवला. 

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी- 

मतकुणकी येथील सुधीर घोरपडे याची बहिण विद्याराणी हिचा विवाह हिवरे (ता. खानापूर) येथील शिंदे कुटुंबात झाला होता. विवाहानंतर सासरच्या छळाला कंटाळून विद्याराणी हीने आत्महत्या केली. परंतू ती आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी तिचा खून केल्याची फिर्याद माहेरच्या मंडळींनी विटा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवला होता. या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटले होते. त्यामुळे विद्याराणीचा भाऊ सुधीर घोरपडे हा शिंदे कुटुंबियांवर चिडून होता. 

खून का बदला खून- 
विद्याराणीच्या मृत्यूनंतर पाच ते सहा वर्षे खून का बदला खून अशी आग सुधीरच्या मनात धुमसत होता. पाच वर्षानंतरही त्याचा राग कायम होता. 21 जून 2015 रोजी आरोपी सुधीर घोरपडे, रविंद्र कदम आणि अल्पवयीन साथीदार जमिन मोजणीच्या बहाण्याने हिरवरे येथील शिंदे वस्तीवर गेले. त्यावेळी शिंदे कुटुंबातील पुरूष मंडळी कामावर गेली होती. घरामध्ये केवळ तीन महिलाच होत्या. सुधीर घोरपडे याने पाणी मागण्याचा बहाणा करून प्रभावती शिंदे यांना आतमध्ये पाठवले. त्याचवेळी घरासमोर बसलेल्या निशा ऊर्फ निशिगंधा शिंदे, सुनिता पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला. दोघींना प्रतिकाराची कोणतीही संधी न देता निर्दयपणे हल्ला केल्यामुळे दोघींचा जागीच मृत्यू झाला. दोघींचा आरडाओरड ऐकून प्रभावती बाहेर आल्या. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला चढवला. हल्ल्यात तिघी जागीच गतप्राण झाल्या. तोपर्यंत आरडाओरड ऐकून वस्तीवरील लोक धावले. तेव्हा तिघेजण पळून गेले. 

विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती- 

याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात सुधीर घोरपडे, रवींद्र कदम आणि अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा नोंदवण्यात आला. विटा पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. सांगली जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडालेल्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर बचाव पक्षातर्फे ऍड. प्रमोद सुतार, सहाय्यक ऍड. रूद्र पाटील, अर्जुन मठपती यांनी काम पाहिले. सरकारतर्फे तपासण्यात आलेले साक्षीदार व पुरावे ग्राह्य मानून सुधीर आणि रवींद्र याला दोषी ठरवण्यात आले होते. आरोपींनी सहा वर्षे थांबून अतिशय थंड डोक्‍याने आणि निर्दयपणे खून केल्यामुळे फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तर बचावपक्षाने कमीत कमी शिक्षेची मागणी केली होती. 

निकालाची उत्सुकता- 
हिवरे तिहेरी खून प्रकरणी न्यायाधीश कोणता निकाल देणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निकाल ऐकण्यासाठी न्यायालय आवारात गर्दी झाली होती. दोघांना मरेपर्यंत कारावास आणि प्रत्येकी एक लाख रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com