घरीच उपचार करून झाले अडीच हजार जण कोरोनामुक्त

अजित झळके 
Thursday, 3 September 2020

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 863 तर शहरात 200 हून अधिक तर महापालिका क्षेत्रात 1 हजार 411 रुग्णांनी घरी राहून कोरोनावर मात केली आहे. एकूण अडीच हजारावर रुग्ण घरी राहून कोरोनामुक्त झालेत. 

सांगली : कोरोनाचे संकट अधिक गडद होत चाललेय. वैद्यकीय पंढरीही हतबल आहे. रुग्णांना बेड मिळेना झालेत. अशावेळी तरुणांना कोरोना झाला तर त्यांनी घरीच उपचार घ्यावेत, यासाठी होम आयसोलेशन पद्धतीला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 863 तर शहरात 200 हून अधिक तर महापालिका क्षेत्रात 1 हजार 411 रुग्णांनी घरी राहून कोरोनावर मात केली आहे. एकूण अडीच हजारावर रुग्ण घरी राहून कोरोनामुक्त झालेत. 

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 13 हजारावर पोहोचलीय. सध्या उपचाराखालील रुग्णसंख्या सहा हजारावर आहे. उपलब्ध खाटा आणि रुग्णसंख्येतील ही झपाट्याने होणारी वाढ यामुळे ताळमेळ चुकला आहे. कोरोना रुग्णालय, शासकीय रुग्णालय, कोविड केअर सेंटर यावर प्रचंड ताण येत आहे. अत्यवस्थ रुग्णांना खाटा मिळत नाहीत. ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरचा तर प्रचंड तुटवडा आहे. अशावेळी रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या मर्यादित ठेवण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी ज्याच्या घरी स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय आणि खेळती हवा आहे, अशा लोकांना होम आयसोलेशन केले जाते. त्याला यशही यायला लागलेय. 

जिल्हा परिषदेच्या निरीक्षणाखाली जिल्ह्यातील 2 हजार 488 लोकांना घरात ठेवूनच उपचार करण्यात येत आहेत. त्यापैकी ऑगस्टअखेर 863 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. उर्वरीत रुग्ण घरात उपचार घेत आहेत. महापालिका क्षेत्रात 2795 लोकांना होम आयसोलेशन केले होते. त्यापैकी 1411 लोक कोरोनामुक्त झालेत. 1384 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत, कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा समावेश आहे. हे नेतेही घरात थांबूनच उपचार घेत होते. 

* घरपोच औषधे 
महापालिकेचा दवाखाना किंवा ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राकडून होम आयसोलेशन झालेल्या रुग्णांना औषधांचा पुरवठा घरीच केला जातो. ती औषधे सांगितलेल्या वेळेनुसार घ्यायची आहेत. जिल्हा परिषदेतून दिवसातून दोनवेळा फोन येतो. त्यावर ताप, सर्दी, खोकला आदी काही लक्षणे असतील तर सांगावीत. अचानक त्रास व्हायला लागला तरी अत्यावश्‍यक सेवा उपलब्ध केली आहे. 

सतरा दिवस महत्वाचे 

होम आयसोलेशनचा कालावधी सतरा दिवसांचा निश्‍चित करण्यात आला आहे. पैकी पहिले दहा दिवस एका खोलीत बंद रहावे. पूर्णपणे कुटुंबापासूनही दूर रहावे. दहा दिवसानंतर पुढचे सात दिवस घरात वावर चालू शकेल, मात्र घरातून बाहेर पडणे टाळावे. या काळावधीत तीन वेळा जेवण, द्रव्य स्वरुपात अधिक अन्न घ्यावे. शरिरातील पाणी चांगले रहावे यासाठी सरबत, ज्यूस, नारळपाणी, चहा घ्यावा. दिवसातून दोन ते तीन वेळा 15 मिनिटांपेक्षा जास्त वाफ घ्यावी. 

माझ्या कुटुंबातील चार सदस्यांना होम आयसोलेट करण्यात आले आणि त्यांनी घरीच उपचार घेतले. प्रकृत्ती उत्तम असेल आणि काही लक्षणे नसतील तर हे सुरक्षित असल्याचे डॉक्‍टरांनी आम्हाला सांगितले. दररोज प्रकृतीची विचारपूस, वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून पाहणी, औषध पुरवठा केला गेला. आता आमचे कुटुंब कोरोनामुक्त आहे.
- परशुराम एकुंडे, एरंडोली

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two and a half thousand people were coronated by treatment at home