सोन्याची माळ पळवणाऱ्यांना दोघांना नागरिकांनी पाठलाग करून पकडले

संजय गणेशकर
Sunday, 27 September 2020

किराणा मालाच्या दुकानात तंबाखूची पुडी घेण्याच्या बहाण्याने येऊन, दुकानातील महिलेच्या गळ्यातील 24 ग्रॅम वजनाची, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ ओढून घेऊन पळून जाणाऱ्या दोघांना स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून सोन्याची माळ हस्तगत करून दोघांना अटक केली. 

पलूस (गोंदिलवाडी, जि. सांगली) : येथील किराणा मालाच्या दुकानात तंबाखूची पुडी घेण्याच्या बहाण्याने येऊन, दुकानातील महिलेच्या गळ्यातील 24 ग्रॅम वजनाची, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ ओढून घेऊन पळून जाणाऱ्या दोघांना स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून सोन्याची माळ हस्तगत करून दोघांना अटक केली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (ता. 24) सायंकाळी 5.15 च्या सुमारास गोंदिलवाडी (पलूस) येथील श्रीमती बबूताई राजाराम यादव या आपल्या किराणा मालाच्या दुकानात बसल्या होत्या. संशयित आरोपी नीलेश नंदकुमार कोळी व सचिन ज्ञानदेव देसाई (दोघे रा. नागठाणे, ता. पलूस) हे तंबाखूची पुडी खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आले. त्यांनी अचानक श्रीमती यादव यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसडा मारून काढून घेतली. तेथून ते लागलीच आमणापूर रस्त्यावरून जुन्या येळावी रस्त्याकडे मोटारसायकलवरून निघाले.

याची माहिती बबूताई यांचा मुलगा धनाजी यांनी फोनवरून पलूस पोलिसांना दिली. स्थानिक नागरिकांनीही लागलीच चोरट्यांचा पाठलाग केला. पोलिस नाईक किरपेकर व चंद तसेच रघुनाथ माळी, भरत गोंदिल, सुरेश गोंदिल यांनी चोरट्यांना आमणापूर रस्त्यावर दफनभूमीजवळ पकडले. त्या दोघांना श्रीमती यादव यांनी ओळखले, तसेच चोरट्यांनी गवतात टाकून दिलेली 24 ग्रॅम वजनाची व अंदाजे 1 लाख 20 हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हस्तगत केली.

आरोपींना पलूस न्यायालयात शुक्रवारी (ता. 25) हजर केल्यानंतर त्यांना 27 पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. त्यातील नीलेश कोळी याने मार्च 2020 मध्ये किर्लोस्करवाडी येथून मोटारसायकल चोरल्याचे व ती मोटारसायकल सावंतपूर परिसरात सोडून दिल्याचे सांगितले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two chain snatcher's were chased and caught by the citizens

Tags
टॉपिकस
Topic Tags: