...अन्‌ गाव सारे झाले सुने- सुने..!

Varnanagar
Varnanagar

नागठाणे (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गाच्या पूर्वेला वसलेले वारणानगर (लांडेवाडी) हे छोटेसे गाव. अतीत ओलांडून थोडे पुढे गेले, की निसराळे गावामार्गे वारणानगरला पोचता येते. हजारभर लोकसंख्येचे हे गाव. याच गावातील एका कुटुंबातील दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे कुटुंब ठाणे येथून गावी आले होते. या कुटुंबातील 67 वर्षीय वृद्ध अन्‌ त्याचा 27 वर्षीय मुलगा यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनही तत्काळ सतर्क झाले. वारणानगर (लांडेवाडी) हे संपूर्ण गाव मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आले आहे. 

परिसरातील खोडद, निसराळे, खोजेवाडी, जावळवाडी अन्‌ वेणेगाव ही तीन किलोमीटर परिघातील गावेही बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. बाधित कुटुंबातील सदस्य हे शुक्रवारी रामनगर (ठाणे) येथून एका खासगी वाहनाने गावी आले होते. त्यात दोन पुरुष अन्‌ तीन महिलांचा समावेश होता. त्यांचे ग्रामस्थांनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरण केले होते. या कुटुंबातील दोघांना ताप अन्‌ घश्‍याचा त्रास जाणवू लागल्यामुळे नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. रविवारी रात्री उशिरा या दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. 

प्रशासनाने तत्काळ वारणानगर (लांडेवाडी) गाव मायक्रो कंटेनमेंट झोन केले. कुटुंबातील इतर सदस्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने सोमवारी उशिरा तपासणीसाठी पाठविण्यात आले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दा. गुं. पवार, नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. कांबळे, नांदगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. पी. सातपुते, डॉ. एम. पी. रायबोळे यांनी भेट देऊन माहिती घेतली. 

बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या गावात सर्वत्र पोलिस बंदोबस्त आहे. 

कुटुंबातील तरुण जर्मनी रिटर्न! 
या कुटुंबातील एक तरुण जर्मनी येथे होता. मार्च महिन्यात तो भारतात आला. तो थेट गावी आल्यानंतर गावाने त्याचे त्यावेळी विलगीकरणही केले होते. त्याची मुदत संपल्यानंतर व तो ठीक असल्याने त्यावेळी गावाने सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र, आता त्याच्याच घरातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे गाव चांगलेच हादरले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com