इस्लामपुरात 2 दिवस 'शटर डाऊन'चा निर्णय....

धर्मवीर पाटील
शुक्रवार, 20 मार्च 2020

 इस्लामपूर शहर शनिवार आणि रविवार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय आज पालिकेत व्यापक जनहितार्थ झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

इस्लामपूर - इस्लामपूर शहर शनिवार आणि रविवार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय आज पालिकेत व्यापक जनहितार्थ झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शहरात 'होम क्वारंटाईन'ची संख्या ४० असून त्यांच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर दक्षता, नागरिकांची बैठक

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. नागेश पाटील म्हणाले, "प्रभागनिहाय समिती नियंत्रण ठेवेल. बाहेरून आलेल्यांना आजिबात बाहेर पडू द्यायचे नाहीय. त्यांनी घरीच राहायचे आहे. त्यांनी वैद्यकीय सूचनांचा काटेकोर अवलंब करा. आम्ही इस्लामपूरकर कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे स्टिकर वापरूयात. गर्दी टाळूयात. सर्वांनी शिस्त पाळावी." निशिकांत पाटील म्हणाले, "नागरिकांनी गाफील राहू नये, एकट्या प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नाहीत, प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. बाहेरच्यांना प्रवेश देऊ नका, कुणी आले असेल तर प्रशासनाला कळवा, माहिती गोपनीय ठेवू. शासनाने १० बेडची व्यवस्था केली आहे. बाजारपेठ पूर्ण बंद ठेवू. आपल्या एका चुकीचा फटका अनेकांना बसू शकतो. बाहेरचा प्रवास टाळूया." पवार म्हणाल्या, "प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. जनतेने सहकार्य करावे." आरोग्य, स्वच्छता कर्मचाऱ्यांना साधने उपलब्ध करून द्यावीत, औषधांची फवारणी करा, अशा सूचना गजानन पाटीलनी केल्या. शहरात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी स्टँडवरच करण्याची सूचना खंडेराव जाधवनी केली. त्यावर पोलिसांना सूचना केल्याचे प्रांताधिकारीनी स्पष्ट केले. नगरसेवक खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, विक्रम पाटील, अमित ओसवाल, वैभव पवार, सुनील तवटे, उमेश कुरळपकर, विजय पवार, राजू देसाई, गजानन पाटील, राजू ओसवाल, गणेश पाटील उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत शहरांत प्रबोधन केले. रस्त्यावरील दुकाने, हातगाड्या, व्यवहार बंद करण्याचे आवाहन केले. 2 दिवस पूर्ण बंद पाळण्यासाठी सक्रिय सहभागाचे आश्वासन दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two days shutter down decision in Islampur