एकाच भात्यातील बाण "लक्ष्य' साधणार ? 

एकाच भात्यातील बाण "लक्ष्य' साधणार ? 

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होत असून, साताऱ्याचे दोन्ही राजे एकाच पक्षातून एकाच वेळी दोन्ही निवडणुका लढत आहेत. या निवडणुकीत दोघांचीही नेमकी ताकद दिसून येणार आहे. दोघांच्या एकाच वेळी निवडणुका होत असल्याने दोघांच्याही कार्यकर्त्यांना आता एकत्र काम करावे लागणार आहे. निवडणुकीसाठी दोन्ही राजे राजकीयदृष्ट्या एकत्र आले असले, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन या निवडणुकीत दिसणार का, याची उत्सुकता साताऱ्यात आहे. एकाच पक्षात आलेले दोन्ही राजे आपले "लक्ष्य' साधणार का, याचीही जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. 

विधानसभेसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. यासाठीची अधिसूचना जाहीर झाली असून, 21 ऑक्‍टोबरला एकाच वेळी दोन्ही निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आजपर्यंत सातारा विधानसभा असो की लोकसभेची निवडणूक असो, राजघराण्यातील दोन व्यक्ती एकमेकांविरोधात लढल्या गेल्याची अनेक उदाहरणे सातारकरांनी पाहिली आहेत. पण, यावेळेस नेमकी उलटी परिस्थिती असून, राजघराण्यातील दोन राजे एकाच पक्षात एकाच वेळी निवडणूक लढत आहेत. त्यासाठी दोघांचीही एकमेकांना मदत होणार आहे. पण, दोघेही राजकीय दृष्टिकोनातून एकत्र आले आहेत. आता या निवडणुकीच्या निमित्ताने दोघांच्या कार्यकर्त्यांना एकत्र काम करून आपल्या नेत्यांना विजयी करण्याची संधी आली आहे. राजांचे मनोमिलन कार्यकर्त्यांत उतरले तरच हे शक्‍य आहे. त्यासाठी उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आपल्या समर्थकांना एकत्र आणत एकच मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवावे लागेल. ते घडणार का, याची चर्चा आता साताऱ्यात सुरू झाली आहे.

यापूर्वीच्या सातारा लोकसभेच्या आणि सातारा विधानसभेच्या निवडणुकीतील राजघराण्यांतील लढती सातारकरांनी अनुभवल्या आहेत. 1990 च्या सातारा विधानसभेच्या निवडणुकीत अभयसिंहराजे भोसले विरुद्ध राजमाता कल्पनाराजे भोसले अशी लढत झाली होती. राजमाता शिवसेनेतून, तर अभयसिंहराजे कॉंग्रेसमधून निवडणूक लढले होते. 1998 च्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध शिवेंद्रसिंहराजे भोसले अशी चुरशीची लढत झाली होती. यामध्ये उदयनराजे आठ हजारांच्या मताधिक्‍याने विजयी झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 1999 मध्ये साताऱ्यात अभयसिंहराजे भोसले विरुद्ध उदयनराजे भोसले अशी लढत झाली होती. यामध्ये अभयसिंहराजे भोसले पाच हजारांवर मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या 2004 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधून उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीतून शिवेंद्रसिंहराजे भोसले अशी दुसऱ्यांदा लढत झाली. यामध्ये मात्र, शिवेंद्रसिंहराजे अकरा हजारांवर मताधिक्‍याने विजयी झाले होते. या सर्व लढती पाहता राजघराण्यातील व्यक्तींमध्येच चुरशीच्या लढती झालेल्या दिसतात. पण, यावेळेस सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले व सातारा विधानसभेसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमधून कमळाच्या चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची मदत होणार आहे. यानिमित्ताने दोघांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले पाहायला मिळणार का, याची सातारकरांना उत्सुकता आहे. 
 


राजघराण्यातील सत्तासंघर्ष 

लोकसभेसाठीच्या लढती 
सातारा लोकसभा 1996 : उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेचे हिंदूराव नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढली होती. हिंदूराव निंबाळकर अकरा हजार 809 मताधिक्‍याने विजयी झाले होते. यामध्ये उदयनराजेंना एक लाख 78 हजार 717 मते मिळाली होती. तर निंबाळकरांना एक लाख 90 हजार 526 मते मिळाली होती. 

सातारा लोकसभा 1998 : कॉंग्रेसचे अभयसिंहराजे भोसले विरुद्ध शिवसेनेचे हिंदूराव नाईक-निंबाळकर अशी लढत होऊन अभयसिंहराजे एक लाख 81 हजार 476 मतांनी विजयी झाले होते. अभयसिंहराजेंना तीन लाख 89 हजार 238, तर हिंदूराव निंबाळकरांना दोन लाख सात हजार 762 मते मिळाली होती. 

1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यानंतर सातारा लोकसभा निवडणुकीत सलग दोन (1999, 2004) निवडणुकांत राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे हिंदूराव नाईक-निंबाळकर यांचा पराभव केला होता. 

2009 मध्ये उदयनराजेंनी कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी प्रथम सातारा लोकसभेची निवडणूक लढली. त्यांनी शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव यांचा दोन लाख 97 हजार 515 मतांनी पराभव केला. उदयनराजेंना पाच लाख 32 हजार 583 तर पुरुषोत्तम जाधव यांना दोन लाख 35 हजार 068 मते मिळाली होती. 

2014 : उदयनराजेंनी लोकसभेची निवडणूक साताऱ्यातून दुसऱ्यांदा लढली. यामध्ये त्यांनी शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव यांचा दुसऱ्यांदा तीन लाख 66 हजार 594 मतांनी पराभव केला. उदयनराजेंना त्यावेळी पाच लाख 22 हजार 537 तर पुरुषोत्तम जाधव यांना एक लाख 55 हजार 937 मते मिळाली होती. 

2019 : उदयनराजेंनी राष्ट्रवादीतून तिसऱ्यांदा सातारा लोकसभेची निवडणूक लढून विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा एक लाख 26 हजार 568 मतांनी पराभव केला. उदयनराजेंना या निवडणुकीत पाच लाख 79 हजार 26 मते, तर नरेंद्र पाटील यांना चार लाख 52 हजार 498 मते मिळाली होती. 
 

विधानसभेसाठीच्या लढती 

1990 मध्ये सातारा विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अभयसिंहराजे भोसले यांच्याविरोधात राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी शिवसेनेतून निवडणूक लढली होती. यामध्ये अभयसिंहराजे विजयी झाले होते. त्यांना 74 हजार 936, तर कल्पनाराजे भोसले यांना 38 हजार 783 मते मिळाली होती. 

1998 मध्ये सातारा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपमधून उदयनराजे भोसले विरुद्ध कॉंग्रेसमधून शिवेंद्रसिंहराजे भोसले अशी लढत झाली होती. चुरशीच्या लढतीत उदयनराजे आठ हजारांच्या मताधिक्‍याने विजयी झाले होते. उदयनराजेंना 58 हजार 974, तर शिवेंद्रसिंहराजेंना 50 हजार 974 मते मिळाली होती. शिवेंद्रसिंहराजेंची ही पहिली निवडणूक होती. 

1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर साताऱ्यात राष्ट्रवादीचे अभयसिंहराजे भोसले विरुद्ध भाजपमधून उदयनराजे भोसले अशी लढत झाली होती. यामध्ये अभयसिंहराजे भोसले हे पाच हजार 363 मताधिक्‍याने विजयी झाले होते. त्यांना 59 हजार 780, तर उदयनराजेंना 54 हजार 417 मते मिळाली होती. 

2004 च्या सातारा विधानसभा निवडणुकीत भाजपमधून उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीतून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात दुसऱ्यांदा लढत झाली. यामध्ये शिवेंद्रसिंहराजे अकरा हजारांच्या मताधिक्‍याने विजयी झाले होते. त्यांना 82 हजार 238 तर उदयनराजेंना 71 हजार 324 मते मिळाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com