वाळवा तालुक्‍यात दोन लाख पशुधन धोक्‍यात; अनेक डॉक्‍टर कोरोनाबाधित 

पोपट पाटील
Saturday, 3 October 2020

कोरोनाच्या महामारीत वाळवा तालुक्‍यातील 2 लाखाच्यावर शेतकऱ्यांचे पशुधन धोक्‍यात येण्याची चिंन्हे दिसू लागली आहेत.

इस्लामपूर (जि. सांगली) : कोरोनाच्या महामारीत तालुक्‍यातील 2 लाखाच्यावर शेतकऱ्यांचे पशुधन धोक्‍यात येण्याची चिंन्हे दिसू लागली आहेत. जनावरांच्यावर उपचार करणारे डॉक्‍टरच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सप्टेंबर - ऑक्‍टोबर महिन्यात लाळ खुरकत या आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून करण्यात येणारे लसीकरण होणार की नाही या काळजीने ग्रामीण भागातिल शेतकरी चिंतेचे आहेत. 

वाळवा तालुक्‍यात मार्चच्या शेवटच्या आठवड्या पासून कोरोना विषाणूची लागण सुरू झालेली आहे. परंतु या परिस्थितीत सुद्धा पशुसंवर्धन विभागा मधील पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी हे जनावरांच्या वरती उपचार करीत आहेत. प्रशासनाने त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण किट दिलेले नाही. तरीसुद्धा बिना संरक्षण किटचे हे डॉक्‍टर आपले काम बजावत होते. त्यांचा प्रत्येक घराशी संबंध येत आहे. त्यामुळे त्यांच्यातील दोन डॉक्‍टरांना कोरोना विष्णूची लागण झाली आहे. त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत.

त्याचबरोबर तालुक्‍यात कोरोनाचा खूपच प्रसार झाला आहे. तर काही ठिकाणी शेतकरी सुद्धा कोरोनाच्या भीतीने पशुवैद्यकाना तुमचे तुमीच लसीकरण करा, जवळ येऊ नका अशा प्रकारे पशुवैद्यकाला तुच्छ वागणूक देत आहेत. पाळीव जनावरांना वर्षातून एकदा प्रतिबंधक उपाय म्हणून शासनामार्फत घटसर्प , बुलकांडी, फऱ्या, लाळ खुरकत,या आजारा करिता लसीकरण केले जाते. हे विषाणू जन्य आजार जनावरांना खूप घातक आहेत.त्यावर लसीकरण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. वेळेत लसीकरण केले नाही तर जनावरांना हे आजार होऊन मोठे आर्थिक नुकसान होते. जनावरे दगवण्याचं प्रमाण यात अधिक आहे. 

घरोघरी संपर्क... 
प्रशासनाने पशुवैद्यकीय विभागास लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु शासनाने या विभागातील डॉक्‍टरांना कोणत्याही प्रकारचे कोरोनासाठी चे संरक्षण किट दिलेले नाही. त्यामुळे लसीकरण करणाऱ्या पशुवैद्यकच कोरोना पॉसिटीव्ह झालेले आढळत आहेत. लसीकरण करताना प्रत्येक घरोघरी डॉक्‍टरांचा संपर्क येत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती वर्तवली जात आहे. 

पशुवैद्यकीय डॉक्‍टरांना सुद्धा विमा कवच द्या

कोरोनामुळे राज्यात 9 पशुवैद्यकीय डॉक्‍टर मृत्युमुखी पडले आहेत तर 285 कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशा अवस्थेत लसीकरण करण्यास पशुवैद्यक बाहेर पडल्यास कोरोनाचा फैलाव अधिकच होईल. इतरांप्रमाणे पशुवैद्यकीय डॉक्‍टरांना सुद्धा विमा कवच द्यावे. कोरोना संरक्षणासाठी किट, मास्क मिळावेत शिवाय काही दिवस ( एफ एम डी ) लाळ खुरकत रोगाचे लसीकरण पुढे ढकलावे.

- डॉ. संजय पवार, पशुधन विकास अधिकारी

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two lakh animal's in danger in Valva taluka; Many doctors are corona positive