
पवार यांचे काम संपूर्ण देशभरात परिचित आहे. ते समाजसेवक म्हणून परिचित आहेत. त्यांनी गावातील व्यसनमुक्तीचा लढा सुरू केला. ही चळवळ यशस्वी झाल्यानंतर त्यांना गावातील लोकांनी सरपंच होण्याचा आग्रह केला. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पीकपद्धतीत बदल केला. कमी पाण्यावर येणारी पिकांना त्यांनी प्राधान्य दिलं
नगर : आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष व हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार व अकोले तालुक्यातील बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. एकाच वेळी दोन व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
समाजसेवक म्हणून परिचित
पवार यांचे काम संपूर्ण देशभरात परिचित आहे. ते समाजसेवक म्हणून परिचित आहेत. त्यांनी गावातील व्यसनमुक्तीचा लढा सुरू केला. ही चळवळ यशस्वी झाल्यानंतर त्यांना गावातील लोकांनी सरपंच होण्याचा आग्रह केला. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पीकपद्धतीत बदल केला. कमी पाण्यावर येणारी पिकांना त्यांनी प्राधान्य दिलं. शेजारील डोंगरावर वृक्षलागवड केली. तसेच जागोजागी पाणलोटाची कामे केली. त्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा संचय झाला. त्यातून गाव खऱ्या अर्थाने हिरवे झाले. गावाचे उत्पन्न वाढले. तरूणांच्या हाताला गावातच काम मिळाले.
चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, कुपनलिका बंदी
चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, कुपनलिका बंदी असे विशेष प्रयोगही त्यांनी केले. गावातील सर्वच घरे महिलांच्या नावावर आहेत. सर्व निर्णय ग्रामसभेला विचारात घेऊनच होतात. चित्रपट अभिनेता अमीर खान यालाही या गावाने भूरळ घातली आहे. पवार हे मूळ क्रिकेटपटू आहेत. त्यांनी विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी कामास सुरूवात केली होती. ती आज तागायत सुरू आहे. ते जलतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
दुर्मिळ देशीवाणांचे जतन
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचे कार्य अनमोल आहे. त्यांनी देशी बियाण्यांची बॅंक केली आहे. त्यातूनच त्यांना मदर ऑफ सीड असे सन्मानाने म्हटले जाते. संकरित वाणांचा सुळसुळाट झाला असतानाही त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यामुळे दुर्मिळ देशीवाणांचे जतन होत आहे. आदिवासी भागात राहून त्यांनी देशी वाणांचे जतन केले, तसेच त्याचा प्रसार व प्रचार केला. इतर महिलांनीही त्यांनी हे काम करण्यास भाग पाडले.