esakal | चिक्कोडी-मिरज राज्य महामार्गावर दोन दुकाने आगीत खाक

बोलून बातमी शोधा

null

चिक्कोडी-मिरज राज्य महामार्गावर दोन दुकाने आगीत खाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंकली (बेळगाव) : येथील चिक्कोडी-मिरज राज्य महामार्गावर असलेल्या विजय बॅटरी व स्टार इलेक्ट्रॉनिक या दोन दुकानांना शुक्रवारी (ता. २३) रात्री ९ वाजता आग लागल्याचे निदर्शनास आले. या घटनेत दोन्ही दुकाने खाक होऊन ९ लाखोंचे नुकसान झाले. घटनास्थळी चिक्कोडी, रायबाग व चिदानंद कोरे कारखान्याच्या अग्निशमन दलाने धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी,

चिक्कोडी-मिरज रस्त्यावर असलेल्या विजय बॅटरी व त्याला लागून असलेल्या स्टार इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही दुकानांना अचानक आग लागल्याचे शुक्रवारी रात्री लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने नियंत्रण मिळवता आले नाही. या दरम्यान चिक्कोडी, रायबाग तसेच चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्यातील अग्निशामक दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होताच साधारणपणे दीड तासात आग आटोक्यात आणण्यात आली.

विजय बाबू बेळवी यांच्या मालकीच्या विजय बॅटरी या दुकानातील विविध प्रकारच्या बॅटऱ्या व इतर सामान जळून खाक झाले. यामध्ये त्यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. शेजारीच असलेले ज्योतीराम शंकर घाडगे यांचे एलईडी व एलसीडी दुरुस्त करण्याचे स्टार इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान जळाले. यामध्ये त्यांचे सुमारे चार लाखाचे नुकसान झाले. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. शनिवारी सकाळी तलाठी एस. व्ही. गवी यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर ग्राम पंचायत सदस्य, पदाधिकारी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. नुकसानीबद्दल ग्रामस्थातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By- Archana Banage