ग्रामीण भागात 25 दिवसांत आढळले दोन हजार नवीन रुग्ण

अजित झळके 
Thursday, 27 August 2020

जिल्ह्यात जुलै महिन्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढली होती. आता ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढल्याचा वेग अधिक झाला.

सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढली होती. आता ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढल्याचा वेग अधिक झाला. गेल्या 25 दिवसांत तब्बल दोन हजार नवीन रुग्ण ग्रामीण भागात आढळले आहेत. 24 मार्च ते 31 जुलै या काळात ग्रामीण भागात दररोज आठ इतक्‍या सरासरीने रुग्ण सापडत होते.

ती सरासरी ऑगस्टमध्ये रोज 80 झाली आहे. दुसरीकडे पावणेदोनशे गावे आणि वाड्यांनी कोरोनाला सीमेवरच रोखण्यात यश मिळवले आहे. 
कोरोनाची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. या स्थितीत ग्रामीण आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भिती आहे. शहरातील यंत्रणेवर त्याचा प्रचंड ताण आला आहे. आता रुग्णांना खाटा मिळत नसल्याचे चित्र समोर आलेय.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या तीन हजार झाली. ती जुलैअखेर 1 हजार 36 इतकी होती. कोरोनाचा शहरी भागातील वेग गतीने वाढत असताना ग्रामीण भागात मात्र कोरोना थोपवण्यात यश आले. जूनअखेरपर्यंत त्याचा वेग अत्यल्प होता. गावांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शिराळा आणि जत तालुक्‍यातील काही गावांचा अपवाद वगळता ग्रामीण भाग तुलनेत सुरक्षित होता. आता सातशेपैकी फक्त पावणेदोनशे गावे आणि वाड्यांवरच कोरोना पोहचायला बाकी आहे. त्यांनी काटेकोर नियोजन, शिस्त, गर्दी टाळून कोरोना येणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरी भागातील कोरोना नियंत्रणात आणताना ग्रामीण भागातील फैलावही नियंत्रणातच राहील, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची सूचना केली होती. आता परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत निघाली आहे. ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आरोग्य यंत्रणा सहन करू शकत नसल्याचे स्पष्ट व्हायला लागले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णांनाही फार लक्षणे नसतील तर घरीच थांबवून उपचार द्यावे लागणार आहेत. त्याची सुरवात काही ठिकाणी झाली आहे. 

प्रमुख कारणे काय? 
ग्रामीण भागात मार्च ते जुलै या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग मर्यादित होता. या भागातील लोकांचा शहरी भागात संपर्क मर्यादित होता. तो ऑगस्टमध्ये वाढला. नोकरी, व्यवसाय, कामाच्या निमित्ताने शहरातील आवक-जावक वाढली. बाधिताच्या संपर्कात आलेल्यांवर नियंत्रण करण्यात यंत्रणा कमी पडत आहे. प्रतिबंधित क्षेत्राचे नियम काटेकोर पाळले जात नाहीत. 

120 जणांचा मृत्यू 
ग्रामीण भागातील 120 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात आटपाडी तालुक्‍यातील 4, जत 7, कडेगाव 7, कवठेमहांकाळ 4, तासगाव 19, वाळवा 10, खानापूर 3 तर शिराळा तालुक्‍यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. 

तालुकानिहाय रूग्णसंख्या 

आटपाडी - 373 
जत - 310 
कडेगाव - 198 
कवठेमहांकाळ - 277 
खानापूर - 242 
मिरज - 818 
पलूस -  286 
शिराळा - 389 
तासगाव - 323 
वाळवा - 532 

ग्रामीण भागात गेल्या दोन आठवड्यात दोन सर्वेक्षण फेऱ्या झाल्या. 50 वर्षावरील लोकांची सर्वेक्षण करत आहोत. आशा वर्कर्स, वैद्यकीय अधिकारी, सहायक, सेवक अशी टीम आहे. कुठलीही लक्षणे नसलेल्या 590 लोकांना बाधा झाल्याचे शोधून काढले. मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष असेल. पुढील काही दिवसांत 40 हजार अँटीजेन तपासण्या होतील. लवकर अहवाल प्राप्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
- डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी. 

 
सांगली 
संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two thousand new patients found in 25 days in rural areas