
सांगली शहर आणि जिल्ह्यात दुचाकी चोरांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. शहरासह जिल्ह्यात दररोज कोठे ना कोठे एक तरी दुचाकी चोरीलाच जाते.
सांगली : शहर आणि जिल्ह्यात दुचाकी चोरांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. शहरासह जिल्ह्यात दररोज कोठे ना कोठे एक तरी दुचाकी चोरीलाच जाते. चोरीच्या दुचाकी कमी किंमतीत विकून चैनी केली जाते. अनेकदा परराज्यात या दुचाकींची विक्री केली जाते. एलसीबीच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच दुचाकी चोरट्यास जेरबंद करून त्याच्याकडून दुचाकी जप्त केल्या. केवळ चैनीसाठी दुचाकी चोरी केल्याची समोर येत आहे.
जिल्ह्यातील दुचाकींची संख्या लाखात आहे. बॅंका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांकडून तत्काळ अर्थसहाय्य केले जात असल्यामुळे दुचाकी सहजपणे खरेदी करता येते. दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असताना दुसरीकडे सहजपणे दुचाकी चोरली जात असल्याचे दिसते.
फ्लॅटचे पार्किंग असो, की अंगणातील दुचाकी असो अगदी सहजपणे चोरी जात आहे. लॉक तोडून काही वेळात दुचाकी चोरून नेली जात आहे. चोरीची दुचाकी अवघ्या दहा-वीस हजार रुपयांत विकली जाते. अनेकदा शेजारील राज्यात त्याची विक्री केली जाते. काही चोरटे सुटे भाग विक्री करून पैसे कमावतात.
दोन दिवसांपूर्वीच सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील शेतातील घरासमोर लावलेती दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. जिल्ह्यात सरासरी दररोज एक दुचाकी चोरीची घटना पोलिस दफ्तरी नोंदवली जात असल्याचे चित्र आहे. सांगली शहर, संजयनगर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात नोंदवले गेले आहेत. अनेक टोळ्या सक्रिय असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सुरक्षितेची गरज
राज्यात दरवर्षी सुमारेस 36 हजार वाहनांची चोरी होते. त्यापैकी 14 हजार वाहनांची शोध घेण्यात पोलिसांनी यश येत आहे. अनेकदा सुरक्षा साधनांचा वापर न केल्याने चोरी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनीही वाहन चोरी रोखण्यासाठी सुरक्षिता बाळगणे गरजेचे आहे.
संपादन : युवराज यादव