उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. ही भेट सकारात्मक झाली असे त्यांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात येत असले, तरी याबाबतचा संभ्रम अद्याप कायम राहिला आहे. उदयनराजे उद्या (बुधवारी) आपल्या निवडक समर्थकांबरोबर पुन्हा चर्चा करणार आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे उद्या काय राजकीय घडामोडी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सातारा - गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. ही भेट सकारात्मक झाली असे त्यांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात येत असले, तरी याबाबतचा संभ्रम अद्याप कायम राहिला आहे. उदयनराजे उद्या (बुधवारी) आपल्या निवडक समर्थकांबरोबर पुन्हा चर्चा करणार आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे उद्या काय राजकीय घडामोडी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. गेले महिनाभर कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीतून आऊटगोईंग जोरात सुरू आहे. लोकसभेच्या निकालानंतर अलीकडेच साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेशासाठी आग्रही आहेत, असे सांगण्यात येत होते.

दरम्यान, त्यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अलीकडेच त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादी न सोडण्याची विनंती केली होती. पण त्यानंतरही उदयनराजे हे भाजप प्रवेशावर ठाम होते.

विधानसभेबरोबर लोकसभेची निवडणूक घेण्याच्या अटीवर त्यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कबूल केले होते. गेले दोन दिवस उदयनराजे पुणे व मुंबईत तळ ठोकून आहेत. काल काही निवडक कार्यकर्त्यांशी त्यांनी भाजप प्रवेशाबाबत चर्चा केली. या चर्चेतून भाजपमध्ये न जाण्याचा सल्ला कार्यकर्त्यांनी दिला होता. पण आज उदयनराजे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतरही त्यांच्या भाजप प्रवेशाचा संभ्रम कायम राहिला आहे. या बैठकीत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली असली, तरी उदयनराजे भाजप प्रवेशाबाबत द्विधा मनोवस्थेत असल्याचेच स्पष्ट होत आहे. ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale BjP Entry Confusion Politics