उदयनराजेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक; राष्ट्रवादीला घरचा आहेर

Udyanraje Bhosale
Udyanraje Bhosale

मोरगिरी : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने आजपर्यंत धाडसी निर्णय घेऊन ते राबवलेही. त्यांचे कौतुक केलेच पाहिजे, असे गौरवोद्‌गार खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. आघाडीच्या काळात भरपूर घोषणा झाल्या. मात्र, अंमलबजावणी झाली नाही, अशी टीका करून त्यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला.

शंभूराज देसाईंनी लोकनेत्यांसारखे लोकांचे प्रेम कमावले. ते भाजप-शिवसेना आघाडीचे सांगत होते. त्या वेळी मी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांमध्ये गप्प बसलो होतो. मी कोणत्या पक्षात आहे, तेच कळत नव्हते; पण पक्ष कोणताही असो, लोकं काम करणाऱ्यांच्या मागे उभी राहतात. शंभूराज देसाईंचे मतदारसंघातील काम मोठे आहे, असे उदयनराजेंनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट केला.

सरदार वल्लभभाई पटेल यांना प्रचलित राजकारण्यांमुळे पंतप्रधानपदापर्यंत जाता आले नाही. तीच परिस्थिती महाराष्ट्रातील लोकनेत्यांबाबतही झाली आहे. क्षमता असताना बाळासाहेब देसाई यांना मुख्यमंत्रिपदापासून वंचित ठेवले गेले. ज्यांनी लोकनेत्यांच्या भरवशावर राजकारण केले, त्यांचे स्मारक होणे आवश्‍यक होते, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत तत्कालीन आघाडी सरकारवर 
टीका केली. 

दौलतनगर (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे राज्य शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र दौलत’ या शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन व दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन, तारळी धरणातून ५० मीटर हेडवरील जमीन क्षेत्रास पाणी देण्याच्या योजनेचे आणि ५४ नळ पाणीपुरवठा योजनांचे ई भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शंभूराज देसाई, शिवाजीराव नाईक आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘‘लोकनेते बाळासाहेब देसाईंचा वारसा शंभूराज देसाई समर्थपणे चालवताहेत. ज्या व्यक्तीने महाराष्ट्र घडवण्यात प्रमुख भूमिका निभावली. आधुनिक महराष्ट्राचा इतिहास ज्या व्यक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अशा लोकनेत्यांचे स्मारक करण्यासाठी इतका वेळ लागण्याची आवश्‍कता नव्हती. त्यांच्यावर राजकीय अन्याय झाला.’’ शंभूराज देसाईंच्या पाठपुराव्याने तारळे विभागातील २५०० एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. महाराष्ट्रातील १८ हजार गावांना पिण्याच्या पाण्याची योजना देण्याचे काम पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून होत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

चार वर्षांच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सरकारकडून चांगले सहकार्य मिळाले. लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने पद्मभूषण, पद्मश्री किंवा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण हा मरणोत्तर पुरस्कार द्यावा, अशी मागणी आमदार देसाई यांनी केली. मोरणा गुरेघर धरण कालवा, वाडी वस्तीतील विकासकामांसाठी निधी देण्याची मागणीही त्यांनी केली. मंत्री राम शिंदे यांचेही भाषण झाले. अशोकराव पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com