चंद्रकांतदादांची काय इच्छा आहे?: उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

"दादांची काय इच्छा आहे? मी येऊ नये अशी आहे का? कोणी मला "खो' घालू शकत नाही. घातला तर मीच 'खो' घालू शकतो. तेव्हा कोणीही त्या विचारात न असलेले बरे. मी सकारात्मक विचार करत असतो. केव्हाही नकारात्मक विचार करत नाही.

सातारा : माझ्या अडचणीच्या काळात माझी पाठराखण करणारे लोकच माझ्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री आहेत. हे लोकच माझ्यासाठी सर्वकाही आहेत. हे नसते तर मागेच मी निराशेत गेलो असतो. माझ्या अडचणीच्या काळात मला कोणाची मदत झाली नाही, असे शल्य खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केले. 

उदयनराजेंची इच्छा आहे की, दिल्लीत जाऊन त्यांनी भाजप प्रवेश घ्यावा, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले असल्याचे पत्रकारांनी सांगताच उदयनराजे म्हणाले, "दादांची काय इच्छा आहे? मी येऊ नये अशी आहे का? कोणी मला "खो' घालू शकत नाही. घातला तर मीच 'खो' घालू शकतो. तेव्हा कोणीही त्या विचारात न असलेले बरे. मी सकारात्मक विचार करत असतो. केव्हाही नकारात्मक विचार करत नाही. लोकांचे हित जोपासले गेले पाहिजे, हाच माझा सकारात्मक विचार आहे. कोणत्या पक्षात जायचे, नाही जायचे, ते नंतर बघू.'' 

उत्सवात दणदणाट हवाच 
शासनाने विचार केला पाहिजे. "आवाजाच्या भिंती' का नकोत? बेरोजगारी वाढली आहे. लोकांनी पैसे गुंतविले आहेत. "आवाजाच्या भिंती'ने असे काय होणार? आवाजाच्या भिंतींमुळे इमारत पडली हे निमित्त झाले आहे. त्यामुळे इमारती पडत असत्या तर सर्जिकल स्ट्राइकसाठी विमानांऐवजी "आवाजाच्या भिंती'च वापरल्या गेल्या असत्या. आवाज वाढविला असता की तिकडे सगळे साफ झाले असते. कायपण लोक बोलत असतात. ढोलांचे आवाजही तेवढेच असतात. "आवाजाच्या भिंती' पाहिजेतच. पोरं आहेत म्हटल्यावर तेवढे लावणारच.'' सार्वजनिक गणेश मंडळांनी करोडो रुपये खर्चून सेट उभारण्यापेक्षा ते पैसे पूरग्रस्तांना दिले तर त्यांची घरे उभी राहतील, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udyanraje Bhosale talked about Chandrakant Patil statement