शहर ग्रामीण भागात खाजगी डॉक्‍टरांचा अघोषित बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

मिरज (सांगली) : एकीकडे जिल्हा प्रशासनाने सर्व खाजगी डॉक्‍टरांना दवाखाने उघडे ठेवण्याबाबतचे आदेश काढले असतानाच दुसरीकडे मिरज शहरासह ग्रामीण भागात बहुतांश खाजगी दवाखाने बंद असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात तर सरकारी आदेशाचा संदर्भ देऊन दवाखाने बंद ठेवणार असल्याचे खाजगी डॉक्‍टरांनी जाहीर केले आहे. परंत हे दवाखाने बंद ठेवण्याचे मुख्य कारण हे करोनाचा ससंर्ग रोखण्यासाठीची सुरक्षा साधने बाजारपेठेत उपलब्ध नसल्याचे आहे.

त्यामुळे यापुढे सरकारी यंत्रणांना आता खाजगी डॉक्‍टरांनाही आवश्‍यक असणारी सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. येत्या काही दिवसात सरकारी आदेश आणि खाजगी डॉक्‍टरांचा अघोषित बंद ही कोंडी फुटली नाही तर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडणार आहे.याचा सर्व ताण ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांवर येणार असला तरी हा ताण पेलण्याइतपत ग्रामीण रुग्णालयांची क्षमता नसल्याचे सध्याचे चित्र असल्याने डॉक्‍टरांच्या वैयक्तिक सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घेऊन सरकारने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची वैयक्तिक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याविषयी गांभीर्याने विचार करावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे मिरज शहर अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर यांनी केली आहे. 

सध्या मिरज शहर आणि ग्रामीण भागात किमान तीनशेहून अधिक खाजगी डॉक्‍टर्स रूग्ण सेवा बजावत आहेत. यापैकी अत्यंत नगण्य संख्येने खासगी डॉक्‍टरांनी आपली सेवा सुरू ठेवली आहे. परंतु बहुसंख्य डॉक्‍टरांनी त्यांचे दवाखाने 14 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याच्या नोटिसा बाहेर लावल्या आहेत.मिरज शहर पोलीस ठाण्यात आज पोलीस उपअधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घेतलेल्या बैठकीतही याच मुद्द्यावर चर्चा झाली. यामध्ये सरकारी यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांनी खाजगी डॉक्‍टरांना दवाखाना सुरू ठेवण्याचे आवाहन केले. उपस्थित डॉक्‍टरांनी त्याला होकारही दर्शविला परंतु प्रत्यक्षात मात्र संचार बंदीची कडक अंमलबजावणी आणि डॉक्‍टरांच्या मनातील करोनाविषयीचा भयगंड या दोन प्रमुख कारणांमुळे ग्रामीण भागातील खाजगी आरोग्यव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Undeclared closure of private doctors in rural areas of the city