महिला ग्रामसभेचे कुंडलवासीयांना अनोखे निमंत्रण

शिवकुमार पाटील
Wednesday, 16 December 2020

ग्रामीण विकासात लोकसहभाग वाढावा, यासाठी सतत काहीतरी नवे प्रयोग करून गावचा कारभार लोकाभिमुख बनविण्याचा ध्यास जपणारे ग्रामविकास अधिकारी श्रीधर अच्युतराव कुलकर्णी यांची या अनोख्या निमंत्रण पत्रिकेमागची संकल्पना आहे.

किल्लेमच्छिंद्रगड : भारत सरकार, महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय विकास, यशदा या देवतांच्या कृपाशीर्वादाने, मानव विकास निर्देशांक यांची नात व शाश्वत विकास निर्देशांक (रा. नवागाव, ता. हरीयाली, जि. आनंदपूर) यांची कन्या चि. सौ. कां. स्वच्छतादेवी ऊर्फ जलवाहिनी हिचा विवाह महिला बाल कल्याण यांचे नातू व मागासवर्ग कल्याण (रा. शिक्षण, ता. आरोग्य, जि. जीविका) यांचे सुपुत्र ई-ग्रामराज याच्याशी संपन्न होत आहे.... 

अशा आशयाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत असून, या जगावेगळ्या लग्न सोहळ्याचे आयोजन चक्क नवनिर्वाचित पदवीधर आमदार अरुणआण्णा लाड यांच्या कुंडल (ता. पलूस) ग्रामी होणार असल्याचे पत्रिकेत नमूद केले आहे. 

हटके नावाचे वधू-वर आणि कल्पनाशक्ती पलीकडची नातेवाईकांची नावे वाचून, तसेच लग्नपत्रिकेतील वधू-वरांची गावेही जरा विचित्रच वाटली. त्यातच या अभिनव सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्याने नेमका प्रकार काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता; 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बालसभा, सायंकाळी 6 वाजता वंचित घटक सभा आणि 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या महिला ग्रामसभेचे निमंत्रण कुंडलवासीयांना अनोख्या पद्धतीने देण्यासाठीचा हा नावीण्यपूर्ण प्रयोग असल्याचे समोर आले. 

ग्रामीण विकासात लोकसहभाग वाढावा, यासाठी सतत काहीतरी नवे प्रयोग करून गावचा कारभार लोकाभिमुख बनविण्याचा ध्यास जपणारे ग्रामविकास अधिकारी श्रीधर अच्युतराव कुलकर्णी यांची या अनोख्या निमंत्रण पत्रिकेमागची संकल्पना आहे. बालगोपाळांना शिशु वयातच ग्रामसभेची गोडी लागावी. वंचित घटकांना मानवी शाश्वत विकासाची माहिती व्हावी, यासाठी लग्नपत्रिकेद्वारे निमंत्रण करून ग्रामसभा सशक्त करण्याचा उद्देशही असल्याचे जाणवते.

श्रीधर कुलकर्णी हे ज्या गावी सेवेसाठी रुजू होतात तिथे आपल्या अनोख्या कल्पनाशक्तीने ग्रामविकासात लोकसहभाग वाढवण्यात वाकबगार आहेत. चालूवर्षी त्यांनी कुंडल गावचा बनवलेला विकासकामाचा कृती आराखडा राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शक म्हणून स्वीकारला आहे.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique invitation of Mahila Gram Sabha to the people of Kundal