विद्यापीठे पदव्या देणारी केंद्रे होऊ नयेत : देवेंद्र फडणवीस

विजयकुमार सोनवणे
Thursday, 11 July 2019

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय इमारत आणि परिक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला.

- कुलगुरू डॅा. मृणालिनी फडणीस, महापौर शोभा बनशेट्टी, पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख व्यासपीठावर होते. 

सोलापूर : ''आपले भविष्य आणि भवितव्य आता कौशल्य प्रशिक्षणात आहे. त्यामुळे विद्यापीठे ही केवळ पदव्या देणाऱ्या संस्था न राहता शिक्षणातून संपन्नता आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करणारे केंद्रे व्हावीत. सेवाक्षेत्रातील संधीचा फायदा कसा घेता येईल त्यानुसार अभ्यासक्रम असेल तर उत्तम, नसेल तर आता करावा'', अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी अध्यासन केंद्र सुरु करण्यास राज्य शासन मंजुरी देईल, असेही ते म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय इमारत आणि परिक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कुलगुरू डॅा. मृणालिनी फडणीस, महापौर शोभा बनशेट्टी, पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख व्यासपीठावर होते. 

फडणवीस म्हणाले, ''आज विद्यापीठांचा विस्तार करत आहोत, त्यासोबत गुणवत्ताही आवश्यक आहे. विस्तारासोबत गुणवत्ता आणण्यात आम्ही यशस्वी झालो नाहीत तर विद्यापीठे ही पदव्या देणारी केंद्रे म्हणूनच ओळखली जातील. केवळ पदव्या देऊन देशाचे भले करता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ट्रिलीयन डॅालर इकॅानॅामीची संकल्पना आणली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करून ती पाच ट्रिलीयन डॅालरची अर्थव्यवस्था निर्माण करायची आहे.''

आपण पाच वर्षांत जे पंचवीस लाख कोटी रुपये खर्च करायचो, आता
शंभर लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च करू शकू. त्यातून मोठ्या प्रमाणात विकास होईल, अर्थव्यवस्था सुधारेल, रोजगाराच्या संधी तयार होतील. कुशल मनुष्यबळाशिवाय कोणत्याही अर्थव्यवस्थेचा विकास होत नाही. कुशल मनुष्यबळ तयार करण्याची जबाबदारी ही विद्यापीठाची आहे, शिक्षण संस्थांची आहे. आज अर्थव्यवस्था काय आहे हे पाहून नियोजन केले जाणार आहे. सोलापूर विद्यापीठ हे मानवसंसाधन करण्यात पुढाकार घेईल याचा विश्वास आहे.

राज्यकारभार लोकाभिमुख, समाजाभिमुख कसा असला पाहिेजे याची जाणीव असलेल्या वंदनीय व्यक्तिमत्वांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर यांचा समावेश होतो. अहिल्यादेवींनी तर देशात छिन्नविछिन्न झालेली संस्कृती उभी करण्याचे काम केले. त्यातून या देशाला एकसंध बनविण्याचे काम त्यांनी केली. त्यांची कारकिर्द पाहिली तर, त्यांच्या कामाचा ठसा पहायला मिळतो. त्यांच्या नावाने अध्यासन सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आहे, त्यास राज्य शासन मंजुरी देईल'' असेही फडणवीस यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Universities should not be just designating centers" Devendra Phadanvis