कोल्हापूर, सांगलीतील अपरिचित गड येणार प्रकाशात

कोल्हापूर, सांगलीतील अपरिचित गड येणार प्रकाशात

कोल्हापूर - राज्यातील गड-किल्ल्यांचे आता स्वतंत्र गॅझेट होणार असून, त्याचाच एक भाग म्हणून गॅझेटियर ग्रंथांच्या निर्मितीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. विविध विभागनिहाय लेखनाची जबाबदारी तज्ज्ञांना दिली असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जबाबदारी येथील दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांच्याकडे दिली आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणार असून, यानिमित्ताने काही अपरिचित गड नव्याने प्रकाशात येणार आहेत. 

राज्य शासनाच्या गॅझेटियर विभागातर्फे हे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे ६०० गड-किल्ल्यांची माहिती या ग्रंथातून संकलित होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड, पावनगड, विशाळगड, रांगणा, भुदरगड, सामानगड, पारगड, कलानिधीगड, गंधर्वगड, महिपाल गड, मुडागड, शिवगड, गगनगडाबरोबरच कागलचा यशवंतगड, इचलकरंजीचा भुईकोट किल्ला आदी सुमारे वीस गडांची माहिती ग्रंथातून संकलित होणार आहे. सांगली जिल्ह्यातील प्रचितीगड, बानूरगडाबरोबरच गणेश दुर्ग, जुना पन्हाळा, तासगावची गढी आदी गडांची माहितीही संकलित होईल. 

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्थ असलेल्या गॅझेटियर विभागातर्फे राज्य गॅझेटियर ग्रंथांची निर्मिती केली जात असून, हा अभ्यास केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता, तो राज्यव्यापी करणे, हा या ग्रंथाचा उद्देश आहे. ग्रंथाच्या माध्यमातून त्या-त्या गड-किल्ल्यांचे प्रकार, क्षेत्रफळ व उंची, इतिहास, भौगोलिकदृष्ट्या रचना, वैशिष्ट्ये, सांस्कृतिक, आर्थिक, संरक्षणात्मक महत्त्व, जाण्याचा मार्ग, किल्ल्यावरील वास्तू, शिल्प, शिलालेख, लेणी, मंदिरे, जलव्यवस्था, भुयारी मार्ग, प्रकाशित-अप्रकाशित संदर्भ, उपलब्ध छायाचित्रे व नकाशे आदी गोष्टींची माहिती या ग्रंथातून संकलित केली जाणार आहे. त्यामुळे अनेक दुर्लक्षित गड-किल्ल्यांचा ठेवा छायाचित्र व माहितीच्या रूपाने दुर्गप्रेमींसह अभ्यासकांना उपलब्ध होईल. 

कोल्हापूर, सांगलीतील अनेक गड नव्या पिढीला माहितीही नाहीत. काही गडांच्या तर केवळ अस्तित्वापुरत्या खुणा उरल्या आहेत. त्यामुळे अशा गडांची माहितीही या ग्रंथातून संकलित केली जाणार असून, भविष्यातही ती साऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 
- डॉ. अमर अडके
, दुर्ग अभ्यासक

  • गॅझेटियर विभागातर्फे राज्य गॅझेटियरची निर्मिती
  •   ६०० गड-किल्ल्यांची  माहिती होणार संकलित
  •   ६०० गड-किल्ल्यांची माहिती होणार संकलित
  •   प्रकाशित-अप्रकाशित संदर्भ होणार उपलब्ध
  • माहितीचा ठेवा अभ्यासकांना मिळणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com