या परिसरामध्ये युरियाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी 

सदाशिव पुकळे 
Tuesday, 28 July 2020

झरे(सांगली)- झरे ( ता. आटपाडी) परिसरामध्ये खरीप हंगामातील पिकासाठी युरिया खताची शेतकऱ्यांना गरज आहे. परंतु अनेक ठिकाणी तीनशे ते चारशे रुपये 50 किलोंच्या युरियाच्या गोणीला आकारले जात आहेत. नियमानुसार 267 ते 270 रुपयाने युरिया विक्री करायची आहे. परंतु युरियाचा तुटवडा असल्याचे भासवून युरिया जादा दराने विक्री केली जात आहे. शतेकऱ्यांच्या राजरोस लुटीबाबत संबधितांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

परिसरातील शेतकरी दुष्काळाने पीचला होता त्यातून कसातरी बाहेर येतोय तर युरियाने डोळ्यात पाणी आणले. पाऊस नव्हता त्यामुळे सर्व जमिनी पडीक होती. परंतु या वर्षभरामध्ये पाऊस पडल्याने जमिनीच्या मशागत करून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. 

सध्या सर्व खरीप हंगामातील पिके कोळपणी,भांगलन करून तयार आहेत. सर्वच शेतकऱ्यांना सध्या युरियाची गरज आहे. याचाच फायदा घेऊन अनेक दुकानदार जादा दराने विक्री करीत आहेत. सध्या शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी युरियाची गरज असल्याने दुकानदार सांगेल त्या दराने खरेदी करत आहेत. सर्वच दुकानदारांनी युरियाचा तुटवडा आहे, असं सांगितले जात आहे, ज्यादा दर लावून त्याची विक्री केली जात आहे. प्रत्येक युरियाच्या गोणी मागे पन्नास ते दीडशे रुपये जादा आकारणी होत आहे. 

मी स्वतः युरिया घेण्यासाठी गेलो असता चारशे रुपये 50 किलो गोणीचा दर सांगण्यात आला. मी विचारले एवढे पैसे कशाचे ? युरियाचा तुटवडा आहे असे सांगण्यात आले. याबाबत कृषी अधिकाऱ्यांना फोन वरून संपर्क साधून याची माहिती दिली परंतु त्यांनी कोणतीही चौकशी अथवा कारवाई केलेली नाही. 
- एकनाथ पावणे, सामाजिक कार्यकर्ते 

कृषी विभाग करतोय काय ? 
खरीप हंगामातील पिकांच्या कोळपणी, भांगलन झाली आहे. सर्वच पिकांना युरिया देऊन पाण्याची आवश्‍यकता असताना बाजारामध्ये युरियाचा तुटवडा आहे. ज्यांच्याकडे युरिया आहे ते जादा दराने विकत आहेत. शेतकरी कसातरी दुष्काळातून बाहेर आला आहे. पण युरियाचा दर वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. मग कृषी विभाग करतोया तरी काय ? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. 

संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urea brought tears to the eyes of farmers in this area