चाळीसगाव येथे शनिवारपासून उर्स 

गणेश पाटील
गुरुवार, 29 मार्च 2018

उर्सकाळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी जवळपास 26 'सीसीटीव्ही कॅमेरा' बसविण्यात आले आहेत. शनिवारी (31 मार्च) रात्री बारानंतर पहाटे चारपर्यंत पीर मुसा कादरी बाबांच्या समाधीला गुलाबपाणी, दूध व सुगंधी अत्तराने स्नान करण्यात येईल.

चाळीसगाव - शहरातील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला येथील पीर मुसा कादरी बाबा उर्स शनिवारपासून (31 मार्च) साजरा होत आहे. यानिमित्ताने दर्गा परिसरात नगरपालिका, पोलिस प्रशासन व ट्रस्टतर्फे सर्व तयारी करण्यात आली आहे. 

उरसासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभरातील भाविकांची मोठी उपस्थिती लाभत असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उर्सकाळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी जवळपास 26 'सीसीटीव्ही कॅमेरा' बसविण्यात आले आहेत. शनिवारी (31 मार्च) रात्री बारानंतर पहाटे चारपर्यंत पीर मुसा कादरी बाबांच्या समाधीला गुलाबपाणी, दूध व सुगंधी अत्तराने स्नान करण्यात येईल. शहरातील तमीजोदीन शेख यांच्या घरून रविवारी (1 एप्रिल) दुपारी कुराणखानी व सायंकाळी सातला संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जुन्या नगरपालिका भागातील भालचंद्र देशमुख यांच्या घरातून सोमवारी (2 एप्रिल) सायंकाळी पाचला पूज्य तलवारमातेची मिरवणूक काढण्यात येईल. पीर मुसा कादरीबाबा दरगाह शरीफ ट्रस्टचे सचिव रहेमान जमाल मुजावर यांनी पालिका प्रशासनाच्या सहकार्याने या ठिकाणी स्वच्छता केली आहे. गर्दीमुळे भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी याठिकाणी पार्किंग व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उर्सनिमित्ताने दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या ठिकाणी पाळणे, संसारोपयोगी वस्तू, खाद्य पदार्थ, हॉटेल्स, खेळणे आदी साहित्यांची दुकाने थाटण्यास सुरवात झाली आहे.

Web Title: Urs religious program from Chalisgaon on Saturday