शहर स्वच्छतेसाठी जेसीबीचाच वापर; बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा... वाचा काय आहे प्रकरण 

बलराज पवार
Sunday, 12 July 2020

गतवर्षी महापुरानंतर शहर स्वच्छतेसाठी दुचाकींचा नाही तर जेसीबीचाच वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे

सांगली : गतवर्षी महापुरानंतर शहर स्वच्छतेसाठी दुचाकींचा नाही तर जेसीबीचाच वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्मचाऱ्यांकडून वाहनांचे नंबर लिहिताना अजाणतेपणी किरकोळ चुका झाल्या आहेत. याचा अर्थ बोगस वाहने दाखवून बिले उकळली असा होत नाही. असा खुलासा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केला. ज्यांनी आरोप केले त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई बरोबर खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार करून महापालिकेची बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

महापुराच्या काळात शहराच्या स्वच्छतेसाठी बोगस वाहने दाखवून बिले उकळल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तक्रारीची पडताळणी केली. ते म्हणाले, महापालिकेवर झालेल्या आरोपानंतर आज सर्व जेसीबी एका ठिकाणी बोलावून त्या नंबरची पडताळणी केली. तक्रारदारांनी केलेल्या आरोपातील नंबर हे दुचाकी, चारचाकीचे नसून ते जेसीबीचेच असल्याचे समोर आले आहे. ज्यांनी महापालिकेवर आरोप केले आहेत त्यांची पार्श्‍वभूमी तपासली पाहिजे. त्यांनी समाजासाठी कुठला चांगला मुद्दा उचलून धरला आहे हेही जनतेने तपासले पाहिजे. 

ते म्हणाले, महापालिकेचे कर्मचारी हे जीवाची पर्वा न करता चांगले काम करत आहेत. महापुरात या कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करून सात दिवसात शहर पूर्वपदावर आणले होते. आरोप करणाऱ्यांना हे नाही दिसले. संख्या कमी असतानाही आमचे कर्मचारी प्रामाणिक काम करत आहेत. आरोप करुन कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करु नये. चुकीचे आरोप होऊ लागले तर महापालिकेत रिस्क घेऊन कुणी काम करायला तयार होणार नाही. 

आरोग्य विभागाचे निवेदन 
महापालिकेवर केलेले आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे समोर आल्यानंतर आरोप करणाऱ्यांवर महापालिकेची बदनामी केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे आणि स्वच्छता निरीक्षकांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले. 

कायदेशीर कारवाईची पावले उचलू
महापालिकेवर आरोप करणाऱ्यांनी आधी आरोपाची शहानिशा करावी. चुकीचे आरोप करून यंत्रणेला बदनाम करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची पावले उचलू. 
- नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका  

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of JCB for city sanitation; Warning of legal action against people making rumers