esakal | `या` महापालिकेच्या मुख्यालयातच होतो प्लास्टीकचा वापर

बोलून बातमी शोधा

Sangli-Miraj-Kupwad-MahanagarpalikA

महापालिकेने शहर प्लास्टीकमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी जनजागृती रॅलीही काढली. व्यापारी, विक्रेत्यांना प्लास्टीक न वापरण्याचे आवाहन केले.

`या` महापालिकेच्या मुख्यालयातच होतो प्लास्टीकचा वापर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली - महापालिकेने शहर प्लास्टीकमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी जनजागृती रॅलीही काढली. व्यापारी, विक्रेत्यांना प्लास्टीक न वापरण्याचे आवाहन केले. आठवड्यातून एक दिवस प्लास्टीक गोळा करण्याचे ठरवले. हे सगळे ठरले. मात्र महापालिकेच्या मुख्यालयातच सिंगल युज प्लास्टीकचा वापर केला जात आहे. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
शासनाने प्लास्टीकमुक्तीसाठी त्यावर बंदी घातली आहे. विशिष्ट वजनाच्या वरील प्लास्टीक वापरण्यास परवानगी आहे. मात्र सिंगल युज प्लास्टीकच्या वस्तू वापरल्या जात आहेत. पाण्याच्या बाटल्या, कप, पिशव्या अजूनही वापरल्या जातात. महापालिकेत अशा पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. एकीकडे महापालिका प्रशासन प्लास्टीकच्या वापराबद्दल विक्रेते, व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करते. पण मुख्यालयातच पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या दालनात सिंगल युज प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करण्यात येतो. पदाधिकारी, अधिकारीच जर प्लॅस्टिकचा वापर करत असतील तर नागरिकांवर कारवाई कशासाठी असा सवाल उपस्थित झाला आहे.
शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी महापालिका प्रशासन नागरिक, व्यापाऱ्यांना प्लास्टीकच्या वस्तू वापरु नये असे आवाहन करत आहे. गेल्या आठवड्यात बाजारपेठेत प्लास्टीक शोध मोहीम काढून बाजारातील अनेक दुकानांची तपासणी केली होती. बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आरोग्य विभागाच्या पथकांनी ही मोहीम हाती घेतली होती. स्वच्छता मोहीमेच्या नोडल अधिकारी उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्लास्टीक वापराच्या विरोधात जनजागृती रॅली काढली होती. सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर करु नका, असे आवाहन करण्यात आले होते. प्लास्टिकमुक्तीचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मात्र त्याची सुरुवात स्वत:च्या कार्यालयापासून करण्याची गरज त्यांच्या लक्षात आलेली दिसत नाही. प्रत्येक सभेत, अधिकारी, पदाधिकारी यांच्या दालनात प्लास्टीकच्या बाटली बंद पाण्याचा उपयोग केला जातो. शिवाय प्लास्टीकचे कागद लावलेले बुके वापरले जातात. महापालिकेने समारंभ, कार्यक्रमातही प्लास्टीकचा वापर करण्यास बंदी घातली आहे. असे आढळून आल्यास पाच हजाराचा दंडही आकारण्याचा इशारा दिला आहे. मात्र हे नियम स्वत: महापालिका प्रशासनच पाळत नसल्याचे दिसते. त्यामुळे "आधी केले मग सांगितले' अशी कृती पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे.

डॉ. करीर यांचा आदर्श घ्यावा
सांगलीचे माजी जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे पहिले प्रशासक-आयुक्त डॉ. नितीन करीर यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असताना सांगलीत एका कार्यक्रमासाठी डॉ. करीर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी त्यांना बुके देण्यात आला. मात्र त्यावर प्लास्टीकचे आवरण असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी प्रथम ते प्लास्टीक काढण्यास आयोजकांना सांगितले आणि नंतरच बुके स्वीकारला. त्यांचा आदर्श महापालिका अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे.