शेतकरी ते ग्राहक.. घरपोच भाजीपाला; सोशल मीडियाचा वापर 

सनी सोनावळे
गुरुवार, 26 मार्च 2020

कान्हूर पठार, रांधे येथील शेतकऱ्यांनी त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. शेतातील पालेभाज्या, फळभाज्यांसह अन्य शेतमालाची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली. त्याखाली आपला संपर्क क्रमांक दिला.

टाकळी ढोकेश्वर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभर संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याने प्रशासन जेरीस आले आहे. अशा वेळी पारनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी शेतमाल थेट घरपोच देण्याची सोय केली आहे. 

कान्हूर पठार, रांधे येथील शेतकऱ्यांनी त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. शेतातील पालेभाज्या, फळभाज्यांसह अन्य शेतमालाची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली. त्याखाली आपला संपर्क क्रमांक दिला. अन्य गावांतील शेतकऱ्यांनीही अशी सोय उपलब्ध करून दिल्यास प्रशासनाची अडचण कमी होणार आहे. मात्र, हे सर्व करताना, तोंडाला मास्क व हाताला सॅनिटायझर लावणे, तसेच स्वतःसह इतरांनाही जपणे आवश्‍यक आहे. तशा सूचना प्रशासनाने शेतकऱ्यांना केल्या आहेत.

दुकानदारही ग्राहकांना किराणा मालाची यादी मोबाईलद्वारे पाठविण्यास सांगत आहेत. सर्व माल बांधून तयार झाल्यावर ग्राहकाला दुकानदार फोन करून दुकानात बोलावत आहेत. 
वनकुटे (ता. पारनेर) येथील सरपंच राहुल झावरे यांनी गावात येणाऱ्या शहरवासीयांच्या आरोग्य तपासणीची सोय प्राथमिक आरोग्य केंद्रात केली आहे. तसेच, गावात मास्कचे वाटप केले आहे. 

नागरिकांसाठी सेंद्रिय भाजीपाला 
पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी त्यांच्या वाळुंज (ता. नगर) येथील शेतात सेंद्रिय भाजीपाला "ना नफा- ना तोटा' तत्त्वावर नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यात जवळच्या कंपनीतील मजूर, हातावर पोट असलेल्या कुटुंबांना गायकवाड यांनी भाजीपाला मोफत दिला. 

प्रशासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. सर्व नियम पाळूनही आपण शेतमाल विकू शकतो. आमच्या परिसरातील काही शेतकरी ग्राहकांना शेतमाल घरपोच देत आहेत. नागरिकांनी मोबाईलद्वारे बुकिंग केल्यावर माल घरपोच देत आहोत. त्याचे पैसे ऑनलाइनद्वारे स्वीकारत आहोत. 
- स्वप्नील सोमवंशी, शेतकरी, कान्हूर पठार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of social media to sell vegetables