त्याचा पास मिळाल्याच्या आनंद ठरला क्षणिक... काय झाले?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या यंत्रमाग कामगाराला उत्तरप्रदेश राज्यातील अर्जुनपाठक येथे आपल्या गावी जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑनलाईन पास मिळाला. ही आनंदाची बातमी मित्राला सांगण्यासाठी जात असताना वाटेतच तो कामगार चक्कर येऊन पडला. तेथेच त्याचा मृत्यू झाला.

विटा (जि. सांगली) : येथे लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या यंत्रमाग कामगाराला उत्तरप्रदेश राज्यातील अर्जुनपाठक येथे आपल्या गावी जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑनलाईन पास मिळाला. ही आनंदाची बातमी मित्राला सांगण्यासाठी जात असताना वाटेतच तो कामगार चक्कर येऊन पडला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा आनंद काहीवेळच त्याच्या चेहऱ्यावर तरळला. रामसखा सत्तन मौर्य (वय 55) असे या कामगाराचे नाव आहे. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. 

विटा येथे रामसखा मौर्य अनेक वर्षांपासून यंत्रमाग कामगार म्हणून काम करत होते. कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे ते विटा येथे अडकून पडले आहेत. त्यांचे कुटुंब अर्जुनपाठक येथे आहे. ते गावी जाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते, पण परवानगी मिळत नव्हती. त्यांनी गेल्या आठवड्यात विटा तहसील कार्यालयात ऑनलाईन पाससाठी अर्ज केला होता. 

आज सकाळी त्यांना तहसील कार्यालयातून फोन आला होता. तुमची गावाकडे जाण्याची व्यवस्था झाली आहे. उद्या सकाळी दहा वाजता विटा बस स्थानकातून मिरज येथे जाण्यासाठी बस आहे. तुम्ही आवरून या. मिरजेतून उत्तरप्रदेशकडे जाण्यासाठी ट्रेनची सोय आहे. त्यात तुमचे तिकीट आहे. ही बातमी ऐकल्यावर राम सखा यांना अत्यानंद झाला.

ही आनंदाची बातमी मित्राला सांगण्यासाठी मुंढेमळा (विटा) येथे ते पळत सुटले. मात्र वाटेतच ते चक्कर येऊन पडले. त्यांना सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्‍टरांनी उपचारापूर्वी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची विटा पोलिसात नोंद झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttar Pradesh worker dies at Vita in joy of getting pass.