वाळवा तालुक्‍यात "लाळ खुरकत'ची 70 हजार जनावरांना लस 

पोपट पाटील
Friday, 20 November 2020

संभाव्य लाळ खुरकत आजाराच्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन राज्य शासन व जिल्हा परिषदेंतर्गत पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम राबवली आहे. वाळवा तालुक्‍यातील सुमारे 70 हजार जनावरांना लाळ खुरकत या साथीच्या आजाराचे लसीकरण देण्याचे काम पूर्ण केले आहे.

इस्लामपूर : संभाव्य लाळ खुरकत आजाराच्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन राज्य शासन व जिल्हा परिषदेंतर्गत पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम राबवली आहे. वाळवा तालुक्‍यातील सुमारे 70 हजार जनावरांना लाळ खुरकत या साथीच्या आजाराचे लसीकरण देण्याचे काम पूर्ण केले आहे. पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. नितीन कदम यांनी ही माहिती दिली. 

लाळ खुरकत हा आजार संसर्गजन्य आहे. दोन खुर असणाऱ्या गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या-मेंढ्या, डुक्कर अशा जनावरांमध्ये या रोगाची लागण होते. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये थंडीच्या वातावरणात या आजाराची जनावरांना लागण होण्याची जास्त शक्‍यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जनावरांना लसीकरण करून घेणे गरजेचे असते. शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे तालुक्‍यातील विविध ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. 

याबाबत माहिती देताना अधिकारी नितीन कदम म्हणाले, की लाळ खुरकत या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. सुरवातीस जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. तोंडात छोटे-मोठे व्रण, फोड येतात. ते फुटून तोंडात जखमा होतात. जनावरांना वैरण खाता येत नाही. पायांना जखमा होतात. गाभण जनावरांना गर्भपाताचा धोका वाढतो. दुधाळ जनावरांमध्ये दूध उत्पादनात घट होते. 

आजारी जनावरांचा शिल्लक राहिलेला चारा, पाणी निरोगी जनावरांच्या खाण्यात आला, किंवा तोंडातून पडणाऱ्या लाळीच्या माध्यमातून लाळ खुरकत विषाणूचा प्रसार होतो. यासाठी आजारी जनावर गोठ्यात वेगळे बांधावे. त्याचे तोंड पोटॅशियमच्या पाण्याने स्वच्छ धुणे, ग्लिसरीन लावणे, पायांची जखम धुऊन त्याला मलम लावणे, पशवैद्यकाकडून औषधोपचार करून घेणे या बाबी शेतकऱ्यांनी कराव्यात. अडगळ वस्ती, गावात काही कारणामुळे जनावरांना लसीकरण केले नसेल तर त्वरित नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्याशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे. 

दृष्टिक्षेपात लसीकरण मोहीम 
लसीकरण करावयाच्या जनावरांची संख्या- 97 हजार 
लसीकरण झालेली जनावरे- 70 हजार 
लसीकरण न केलेली जनावरे- 27 हजार 
अंतिम तारीख- 30 नोव्हेंबर 2020

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccination of 70,000 animals against "saliva scabies" in Valva taluka