'वंचित'मधील फूट काँग्रेस आघाडीच्या पथ्यावर 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 8 सप्टेंबर 2019

सोलापूर लोकसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख 51 हजार मताधिक्‍याने पराभव केला होता. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींनी सुशीलकुमारांचा तब्बल एक लाख 58 हजार 608 मताधिक्‍याने पराभव करीत भाजपचा गड राखला.

सोलापूर : जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास ही फूट सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. 

सोलापूर जिल्हा आणि काँग्रेस आघाडीची सत्ता हे एकेकाळी समीकरणच होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून समीकरण बदलले आणि आघाडीचे वर्चस्व कमी कमी होत गेले. 2014 नंतरही 11 पैकी तीन ठिकाणी काँग्रेस, दोन ठिकाणी भाजप, एक ठिकाणी शिवसेना आणि चार ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मताधिक्‍य मिळाले. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख 51 हजार मताधिक्‍याने पराभव केला होता. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींनी सुशीलकुमारांचा तब्बल एक लाख 58 हजार 608 मताधिक्‍याने पराभव करीत भाजपचा गड राखला. महास्वामींना पाच लाख 24 हजार 985, सुशीलकुमारांना तीन लाख 66 हजार 377 आणि प्रकाश आंबेडकर यांना एक लाख 70 हजार 07 मते मिळाली. महास्वामी तब्बल एक लाख 58 हजार 608 मताधिक्‍याने निवडून आले. शिंदे यांना मिळालेली मते आणि वंचित आघाडीच्या मतांची बेरीज केल्यास पाच लाख 36 हजार 384 होतात. जी मते महास्वामींना मिळालेल्या मतांपेक्षा 11 हजार 399 मते अधिक आहेत. मुस्लिम, दलित मते काँग्रेसच्या हक्काची असतानासुद्धा ती "वंचित'च्या पारड्यात गेल्याने शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, माळशिरस व सांगोला तर सातारा जिल्ह्यातील माण व खटाव या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघावर माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कायम वर्चस्व राहिले. त्यामुळे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील असले तरी त्यांच्या विजयामध्ये मोठा वाटा राहिला आहे माळशिरस मतदारसंघाचा. सोलापूर मतदारसंघाप्रमाणे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा तितकासा प्रभाव नाही. त्यामुळे "वंचित'चे उमेदवार ऍड. विजय मोरे यांना 51 हजार 532 मतांवर समाधान मानावे लागले. तर श्री. निंबाळकर यांना पाच लाख 86 हजार 314 आणि श्री. शिंदे यांना पाच लाख 550 मते मिळाली. या घडामोडी पाहता, "वंचित'मध्ये फूट पडली तर त्याचा निश्‍चित फायदा सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीच्या उमेदवारीला होईल अशी शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi and MIM dividation help to Congress in Solapur