esakal | आज वसुबारस... दिवाळी पर्व सुरू!; कोरोना संकटात लोकांमध्ये अमाप उत्साह 
sakal

बोलून बातमी शोधा

 Vasubaras today ... Diwali begins !; Immeasurable enthusiasm among the people in the Corona crisis

वर्षातील सर्वात मोठा दिवाळी सण उद्यापासून (ता. 12) सुरू होतोय. वसुबारसने दीपोत्सवाची सुरवात होते आहे.

आज वसुबारस... दिवाळी पर्व सुरू!; कोरोना संकटात लोकांमध्ये अमाप उत्साह 

sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः वर्षातील सर्वात मोठा दिवाळी सण उद्यापासून (ता. 12) सुरू होतोय. वसुबारसने दीपोत्सवाची सुरवात होते आहे. अंगणात शेणाचा सडा मारून पहिली रांगोळी काढण्याचा, गाय-वासराला ओवाळण्याचा हा दिवस. त्यानंतर पुढील पाच दिवस हा सण उत्साह, जल्लोष आणि आनंदाने साजरा केला जाईल. कोरोना संकट असले तरी लोकांमध्ये अमाप उत्साह आहे. 

दिवाळीच्या तयारीची धामधूम आता शेवटच्या टप्प्यात आहे. फराळ बनवणे, कपड्यांची खरेदी, सजावट साहित्य, घरांची रंगरंगोटी आवरत आले आहे. शुक्रवारी (ता. 13) धनत्रयोदशी, शनिवारी (ता. 14) दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन होईल. सोमवारी दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आहे.

पाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी खरेदीचा धूमधडाका असेल. सोन्या-चांदीपासून वाहन आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स, घर खरेदीची धामधूम असेल. गेल्या सहा-आठ महिन्यांपासून पै-पाहुणे एकमेकांकडे गेले नाहीत. भाऊबिजेच्या निमित्ताने त्यालाही मुहूर्त लाभेल. 

वसुबारस कशी करतात... 
आज वसुबारस. अश्विन महिन्यात वद्य द्वादशी या दिवशी साजरा होतो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा करतात. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात, याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.

या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढायला सुरवात केली जाते. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते. 

संपादन : युवराज यादव

loading image