माझा ‘साताप्पा’ येथे ‘गोकुळात’ खेळतोय - वीरमाता आनंदी पाटील

प्रकाश कोकितकर
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सेनापती कापशी - देशासाठी माझा मुलगा शहीद झाला, याचा मला अभिमान आहे. त्याच्याच नावाने ही शाळा झाली. माझा साताप्पा या गोकुळात आता कायम खेळत राहील. येथील मुलांनीही देशसेवेत जावे, आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन शहीद जवान साताप्पा पाटील यांच्या आई आनंदी महादेव पाटील यांनी केले. 

सेनापती कापशी - देशासाठी माझा मुलगा शहीद झाला, याचा मला अभिमान आहे. त्याच्याच नावाने ही शाळा झाली. माझा साताप्पा या गोकुळात आता कायम खेळत राहील. येथील मुलांनीही देशसेवेत जावे, आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन शहीद जवान साताप्पा पाटील यांच्या आई आनंदी महादेव पाटील यांनी केले. 

मासा बेलेवाडी (ता. कागल) येथे शहीद जवान साताप्पा महादेव पाटील विद्यालयाच्या काल (ता. ९) नूतन इमारतीच्या उद्‌घाटनावेळी वीरमाता पाटील बोलत होत्या.

अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता होत असतानाच वीरमातेने दोन शब्द बोलण्याची संधी मागितली, अन्‌ त्यांच्या एक-एक शब्दांनी श्रोते आणि नेतेही अवाक्‌ झाले. त्या म्हणाल्या, की मी अडाणी आई. मला समजून घ्या. मुलगा म्हणायचा, मी आर्मीतच जाईन. आई तुला दोन मुले आहेत.

त्यातला एक देशासाठी गेला तर काय बिघडले? शेवटी तो देशसेवेत दाखल झालाच. सुटीवर आला तेव्हा पिंपळगावचे कुंडलिक माने शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन आल्यावर तो म्हणाला होता, की अंत्ययात्रेला किती लोक आले होते? मरावे तर असे... आणि काही काळातच तो शहीद झाला. 
या कार्यक्रमास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, व्ही. बी. पाटील, कर्नल आर. के. तिम्मापूर, संजय मंडलिक, अंबरिश घाटगे, वीरपत्नी अश्‍विनी पाटील उपस्थित होते.

सभागृह निःशब्द
वीरमातेचे बोल सभागृहाच्या कानावर पडताच सारेच निःशब्द झाले. पोटच्या गोळ्याच्या कायमच्या जाण्याने तुटणारे मातेचे काळीज या वेळी सभागृहाने अनुभवले. कार्यक्रम संपल्यावरही जागा न सोडता डोळ्यांच्या कडा ओलावलेले सभागृह निःशब्द आणि निश्‍चल झाले होते. शहिदांच्या प्रेरणेबरोबरच एका अशिक्षित वीरमातेच्या मनातील आठ वर्षांनंतर व्यक्त झालेल्या भावना चिरंतन राहतील, असा कार्यक्रमाचा शेवट झाला.

Web Title: VeerMata Anandi Patil Comment