
जनसेवा फळे, भाजीपाला व खाद्यपेय विक्रेता संघटनेतर्फे आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
सांगली : उपयोगकर्ता कर महापालिका क्षेत्रातून हद्दपार करा आणि 2700 विक्रेत्यांचे रखडलेले परवाने तत्काळ द्या, या मागणीसाठी जनसेवा फळे, भाजीपाला व खाद्यपेय विक्रेता संघटनेतर्फे आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. दुपारापासून शकडो विक्रेत्यांनी महापालिकेच्या दारात ठिय्या मारला असून, मुख्यालयास टाळे ठोकले आहे. विक्रेत्यांना परवाने दिल्याशिवाय आंदोलन स्थगित केले जाणार नाही, अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी घेतली आहे. दरम्यान, मदनभाऊ युवा मंच, शिवसेना यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
जनसेवा फळे, भाजीपाला व खाद्यपेय विक्रेता संघटनेचे आज दुपारी येथील स्टेशन चौकातील मोर्चास प्रारंभ केला. शेकडोच्या संख्येने विक्रेते एकवटले होते. महापालिका प्रशासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेच्या मुख्यालयात आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. चर्चेसाठी पुढे कोणी आले नसल्याने मुख्यालयास टाळे ठोकून विक्रेत्यांना ठिय्या मारला. दिवसभर प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सायंकाळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले. त्यात शंभोराज काटकर यांनी आक्रमक भूमिका घेत आजच परवाने द्या, अशी मागणी केली. आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित नसल्याने परवाने देणे शक्य नसल्याने संघटना पुन्हा आक्रमक झाली आणि उपोषणाचा निर्णय घेतला.
श्री. काटकर म्हणाले,""लॉकडाऊन काळात आठ महिने व्यवसाय बंद असलेल्या फेरीवाल्यांकडून 900 रुपयांची अवाजवी उपयोगकर्ता कराची वसुली थांबवावी. गतवर्षी नोंदणी केलेल्या विक्रेत्यांना विनाअट परवाने मिळावेत. बाजार कर कमी करावा यासह इतर मागण्यांसाठी जनसेवा संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही भूमिका घेतली जात नाही. वारंवार विक्रेत्यांना टाळाटाळ केली जात आहे. यासाठी आम्ही उपोषण करत आहोत.''
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनीही यावेळी उपस्थिती लावली. आंदोलनास पाठिंबा देत ते म्हणाले,""महामारीच्या काळात प्रशासनाच योग्य ते सहकार्य सर्व विक्रेत्यांनी केले. त्यांच्या रास्त मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांना झगडावे लागत आहे. संघटनेने घेतलेल्या भूमिकेशी शिवसेनेचा पाठिंबा आहे. त्यांच्या मागणीसाठी नगरविकास मंत्र्यांना विनंती करणार आहोत.''
यावेळी "जनसेवा'चे कार्याध्यक्ष इलियास पखाली, उपाध्यक्ष कैस अलगुर, शंकर चॉंदकावटे, लताताई कांबळे, सचिव अजित राजोबा, खजिनदार मुजीब वागवान, सागर घोडके, संजय शिंदे, राजू नरळे, संदीप ढोले, संदीप साळे, भरत वीरकर, विजय बाबर, प्रशांत शिकलगार, नबी शेख, चेतन च्वाहण, तुळसाबाई कलाल, सखुबाई मासाळ, रेणुका पुजारी, विकास सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील विक्रेते आंदोलनात सहभागी होते.
आंदोलनातील मागण्या
संपादन : युवराज यादव