भाजीपाल्याचे दर कडाडले : कांदे-लसूण दरातही वाढ

घनशाम नवाथे 
Monday, 5 October 2020

सांगली बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी दर कडाडल्याचे चित्र आहे. कांद्याने अर्धशतक केव्हाच गाठले. आता मेथी 25 रुपये पेंडी, कोथिंबीर 30 रुपये पेंडी आणि टोमॅटो 40 रुपये किलो याप्रमाणे इतर भाज्यांचे दर वाढले आहेत. 

सांगली : बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी दर कडाडल्याचे चित्र आहे. कांद्याने अर्धशतक केव्हाच गाठले. आता मेथी 25 रुपये पेंडी, कोथिंबीर 30 रुपये पेंडी आणि टोमॅटो 40 रुपये किलो याप्रमाणे इतर भाज्यांचे दर वाढले आहेत. 

कोरोनाचे संकट आणि आठवडा बाजार बंद असल्यामुळे सध्या मंडई परिसरात भाजीपाला विक्रेते दिसत आहेत. इतर ठिकाणचे आठवडी बाजार अद्याप भरवले जात नाहीत. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांनी ठराविक ठिकाणी विक्री सुरू आहे; तर काहीजण फिरून भाजीपाला विकत आहेत. त्यामुळे काही दिवस भाजीपाला आवक मर्यादितच आहे. तशात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आवक थंडावली आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. 

मेथीची आवक खूपच कमी असून, 15 ते 20 रुपयाला विकली जाणारी पेंडी 25 रुपयाला विकली जात आहे. कोथिंबिरीची आवकही कमी झाली आहे. छोटी पेंडीदेखील 30 रुपयाला विकली जात आहे. टोमॅटोचा दरही 40 रुपये किलो आहे. अन्य भाज्यांमध्ये गवारीची आवक मर्यादित असून, गेले काही दिवस 80 रुपये किलो दर स्थिरच आहे. वांगीही बाजारात कमी असून, दर 80 रुपये किलो इतका आहे. अन्य भाज्यांमध्ये भेंडीची आवकही थोडी कमी असून, दर 60 रुपयांवरून 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. कारली 40 रुपये, घेवडा 40 रुपये, दोडका 40 रुपये, कोबी व फ्लॉवरचा साधारण गड्डा 25 रुपयाला आहे. 

पालेभाज्यांमध्ये तांबडा माठ 20 रुपये, तांदूळ 15 रुपये, पालक 15 रुपये, कांद्याची पात दहा रुपये पेंडी आहे. कांदे 50 रुपये किलो असून, लसणाचा दरही वाढला आहे. 120 ते 140 रुपये किलो इतका दर आहे. बटाटे 40 रुपये किलो, हिरवी मिरची 40 रुपये, ढबू मिरची 40 रुपये किलो याप्रमाणे दर आहे. 

अंडी-चिकन दरात वाढ कायम 
कोरोनाच्या काळात पौष्टिक आहारासाठी अंडी भरपूर प्रमाणात खाल्ली जात आहेत. दरात वाढ झाली आहे. किरकोळ विक्री सहा रुपये नग आहे, तर देशी अंडे काही ठिकाणी 10 रुपयाला नग विकले जात आहे. चिकन दर 220 रुपये आहे. मटण दर 600 ते 620 रुपये किलो आहे.

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable prices go up: Onion-garlic prices also incerased