डोंगर माथ्यावर सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या झाल्या अनोळखी... 

Vegetables that are easily available become unfamiliar .
Vegetables that are easily available become unfamiliar .

मांगले : डोंगर माथ्यावर सह्याद्रीच्या कड्याकपारीत वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जशी वेगवेगळ्या रानमेव्याची चव चाखता येते, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रानभाज्यांची पर्वणी असते; मात्र बदलत्या राहणीमानानुसार जवळ असणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या या भाज्यांपासून आपण दुरावले गेलो आणि काळाच्या ओघात अनेकांना त्या अनोळखीही झाल्या आहेत.... 

गोड, आंबट, तिखट अशा वेगवेगळ्या चवीच्या रानभाज्या ओळखता आल्या पाहिजेत. यांतील अनेक भाज्या जंगलात आणि विशेषत: अभयारण्य परिसरात वावरणारे लोक वनौषधी म्हणून वापरत होते. सह्याद्रीच्या पठारावर आजही या भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. चांदोली धरणाच्या निर्मितीनंतर विस्थापित झालेल्या अनेक वयस्कर महिला-पुरुष यांना या रानभाज्यांची नावे अजूनही तोंडपाठ आहेत. कोणत्या भाजीत काय गुणधर्म आहेत, कोणत्या आजारासाठी कोणती रानभाजी उपयुक्त आहे... याची इत्थंभूत माहिती आजही या विस्थापितांना आहे. 

जंगलात शंभरावर भाज्या आजही उपलब्ध आहेत. यांपैकी पन्नासच्या वर भाज्यांची नावे असणाऱ्या मांगले (ता. शिराळा) येथील विस्थापित चांदोली धरणग्रस्त सोनाबाई नामदेव पाटील या 95 वर्षाच्या आजींना माहिती आहेत. या निमित्ताने त्यांना बोलते केल्यानंतर त्यांनी रानभाज्यांची नावे आणि जंगलाशिवाय शिराळा तालुक्‍याच्या इतर भागातही काही भाज्या उपलब्ध असल्याचे सांगितले. अनेक भाज्यांच्या औषधी गुणधर्मांचीही त्यांनी ओळख करून दिली. चांदोली धरणाच्या निर्मितीआधी कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसणाऱ्या ठिकाणी अनेक आजारांवर रानभाज्यांचा उपयोग होत असे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्यांची चव कोणत्याही मसाल्याशिवाय तोंडाला पाणी सुटेल अशी होती. डॉक्‍टर काय करतात हे आम्हाला विस्थापित झाल्यानंतर समजल्याचे आज्जी सांगतात... 

अनवे, अमरकंद, अळंबी, अघाडा, उळशाचा मोहर, कडकिंदा, कडूकंद, करटोली, काटे-माठ, कुड्याची फुलेकुर्डू, कुसरा, कोळू, कोलासने, कोवळे बांबू, कोळू, गोमाठी, घोळ, चवळीचे बोके, चाईचा मोहर, टाकळा, टेंबरण, टेंभुर्णा, टेहरा, तरोटा, तांदुळजा, अळू, दिघवडी, बहावा, बोखरीचा मोहर, भारंगी, भुईपालक, भुईफोड, भोकर, भोपळ्याची फुले, महाळुंग, माठ, माड, रानकंद मोखा, रताळ्याचे कोंब, रानकेळी, रानतोंडले, रानपुदाना, लोधी, वाघाटी, वाथरटे, शेवग्याची पाने व फुले, सुरणाचा कोवळा पाला, हरबऱ्याची कोवळी पाने, हादगा या रानभाज्या आजही चांदोली अभयारण्यासह शिराळा तालुक्‍याच्या डोंगर कपारीत पाहावयास मिळतात; मात्र त्या शोधल्या पाहिजेत आणि ओळखतही आल्या पाहिजेत. 
चांदोली धरणाच्या निर्मितीनंतर सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत अनेक गावांचे पुनर्वसन झाले. विस्थापित झाल्यानंतर मात्र निसर्गाच्या सान्निध्यात रानभाज्यांची चव चाखणाऱ्या धरणग्रस्तांना या रानवैभवापासून वंचित राहावे लागले आहे. 

आम्ही विस्थापित होण्याआधी गुरे चारणे ते सरपण गोळा करणे आणि रानमेवा शोधासाठी भटकताना वेगवेगळ्या वेली, फळे घरी आणून त्याची चव बघता येत होती. त्याचवेळी रानभाज्या मोठ्या प्रमाणात मिळत होत्या. आम्ही रताळी, नाचणी एवढीच पिके घेत होतो. त्यामुळे आत्ताचा विकतचा भाजीपाला आम्हाला बघायलाही मिळत नव्हता. दररोज वेगवेगळ्या भाज्यांची, रानमेव्याची मेजवानी असायची. त्यामुळे आजार काय असतो हे आम्हाला कळत नव्हते. त्यामुळेच वयाची शंभरी गाठता येत होती. आजही आम्हाला लाभलेले आयुष्य आम्ही विस्थापित होण्यआगोदरच्या आहाराचा परिणाम आहे. 
- सोनाबाई नामदेव पाटील, मांगले. 

निसर्गात वाढलेल्या विषमुक्त विनामशागत भाज्यांची माहिती विशेषत: धनगरवाड्यातील लोकांना जास्त आहे. रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना आणि इतर लोकांना या रानाभाज्यांची ओळख व्हावी, अशी संकल्पना होती. रानभाजी महोत्सवावेळी काही शेतकऱ्यांनी विषमुक्त आणि नैसर्गिक वातावरणात रानभाज्यांचे प्लॉट घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता. अशा भाज्यांच्या संवर्धनासाठी हौशी शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून प्रयत्न करणार आहे. 
- जी. एस. पाटील, कृषी अधिकारी, शिराळा.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com