नो मास्क नो एंट्रीचा बोजवारा; भाजी मंडईत विक्रेतेच विना मास्क, कारवाईचा परिणाम शून्य

बलराज पवार
Sunday, 4 October 2020

सांगली : महापालिकेने शहरात नो मास्क नो एंट्री अभियान जोरात सुरु केले. पण दोनच दिवसात त्याचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.

सांगली : महापालिकेने शहरात नो मास्क नो एंट्री अभियान जोरात सुरु केले. पण दोनच दिवसात त्याचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. भाजी मंडईतील विक्रेत्यांवर कारवाई करत प्रशासनाने दणका दिला, त्याच मंडईत आज विक्रेते आणि ग्राहकही विना मास्कच बिनधास्त असल्याचे दिसून आले. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावावा असे आवाहन पंतप्रधानांपासून सर्व नेते करत आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी रिक्षा, एस टीमध्ये नो मास्क नो सवारी अशी मोहीम सुरु आहेत. त्यापाठोपाठ महापालिकेनेही शहरात नो मास्क नो एंट्री असे अभियान सुरु केले आहे.

महापालिकेचे नूतन उपायुक्त राहूल रोकडे आणि मिरजेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी एकत्रितपणे बाजारात फिरुन विना मास्क असणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांना जागीच दंडाच्या पावत्या हातात देण्यात आल्या. त्यानंतर ग्राहकांनी मास्क घातला नसल्यास त्यांना दुकानात प्रवेश देऊ नये असे आवाहन करण्यात आले. शिवाय ग्राहकाने मास्क घातला नसल्यास त्यांच्यावर आणि दुकानदारावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. 

एवढे सगळे झाल्यावर आज बाजारात विना मास्क फिरणारे अनेक ग्राहक दिसून आलेच. भाजी मंडईतही अनेक विक्रेत्यांनी मास्क लावला नसल्याचे चित्र दिसत होते. प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी अभियान सुरु केले असले तरी या अभियानाला सहकार्य करायचे नाही असेच धोरण विक्रेते आणि ग्राहक यांनी ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे दंड केल्याची माहिती असूनही अनेक विक्रेते बिनधास्त होते. कोरोना आपलं काय वाकडं करणार असेच त्यांना दाखवायचे होते. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vendors in the vegetable market without masks, the effect of 'No mask no entry' action is zero